म. ए. समितीची महाराष्ट्रातील नेत्यांकडे तक्रार
प्रतिनिधी/ बेळगाव
बाळेकुंद्री येथील कंडक्टर मारहाण प्रकरणाला भाषिक रंग देऊन सीमाभागात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत सीमाभागातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली असतानाही क्षुल्लक कारणातून भाषिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने याची तक्रार महाराष्ट्रातील खासदार, आमदारांकडे केली आहे.
शनिवारी सांगलीचे खासदार विशाल पाटील, तसेच आमदार रोहित पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधून लोकसभा व विधानसभेत हा प्रश्न मांडावा, अशी विनंती करण्यात आली. सीमाभागात भाषिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी जैसे थे परिस्थिती ठेवावी, त्याचबरोबर समन्वयासाठी दोन्ही राज्यांचे तीन-तीन मंत्री व आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश करावा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दोन वर्षांपूर्वी केल्या होत्या.
परंतु, ही समिती स्थापन करण्याकडे दोन्ही राज्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच लहान घटनांना भाषिक रंग देऊन सीमाभागातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात लोकसभेत आवाज उठवून सीमावासियांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्याचबरोबर आमदार रोहित पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात याबाबत आवाज उठवू, असे आश्वासन दिले. मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी फोन करून शुक्रवारी झालेल्या घटनेची माहिती दिली.
शुभम शेळकेंकडून समाचार
कंडक्टर मारहाण प्रकरणाची कोणतीही माहिती न घेता केवळ कंडक्टरच्या सांगण्यावरून भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कानडी संघटनांकडून सुरू आहे. स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी भाषिक तेढ निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न सुरू आहे. या विरोधात युवानेते शुभम शेळके यांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.









