देवलापूर येथील युवक
प्रतिनिधी/ बेळगाव
देवलापूर (ता. बैलहोंगल) येथील एका तरुणाचा खून करून मृतदेह नयानगरजवळ नदीत टाकण्यात आला आहे. शनिवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा झाला नाही. बैलहोंगल पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सागर दुंडाप्पा अंबरशेट्टी (वय 27) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी रात्री सागर आपल्या घराबाहेर पडला होता. 7.45 वाजण्याच्या सुमारास त्याने एका मित्राला फोन करून चौघेजण आपल्याला मारहाण करीत आहेत, तू लवकर ये, असे सांगितले. त्यानंतर त्याचा फोन स्वीचऑफ झाला. नयानगर येथील पुलावर सागरची मोटारसायकल आढळून आली.
शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. उत्तरीय तपासणीसाठी तो सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आला. बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक पी. व्ही. सालीमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात डॉक्टरांची भेट घेऊन सागरचा खून कसा झाला असावा, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
गळ्यावर दोरीचे व्रण
उपलब्ध माहितीनुसार सागरच्या गळ्यावर दोरीने गळा आवळण्याचे व्रण आढळून आले आहेत. खुनानंतर त्याला नयानगर येथील पुलाखाली टाकून दिल्याचा संशय आहे. हा प्रकार कोणी केला, याविषयी कसलीच माहिती अद्याप मिळाली नाही. बैलहोंगल पोलीस पुढील तपास करीत आहेत.









