वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एप्रिल महिन्यात द. अमेरिकेत होणाऱ्या 2025 च्या नेमबाजी हंगामातील पहिल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघटनेने 35 सदस्यांचा संघ निवडला असून मनु भाकरकडे या संघाचे नेतृत्व राहिल.
2025 च्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी हंगामाला द. अमेरिकेतील दुहेरी स्पर्धेने प्रारंभ होत आहे. यापैकी पहिली विश्वचषक रायफल-पिस्तुल-शॉटगन नेमबाजी स्पर्धा अर्जेंटिनातील ब्युनोस आयरीस येथे 1 ते 11 एप्रिल दरम्यान होणार आहे. यानंतर पेरुमधील लिमा येथे दुसरी संयुक्त विश्वचषक नेमबाजी स्पर्धा 13 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजित केली आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे स्पर्धक सहभागी होणार आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरने 2 कांस्यपदके मिळविली होती. तिने महिलांच्या 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत तसेच 10 मी. एअरपिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताला दोन कांस्य पदके मिळवून दिली होती. या कामगिरीमुळे मनु भाकरला 2025 सालातील ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. द. अमेरिकेत होणाऱ्या या आगामी दोन नेमबाजी स्पर्धांमध्ये मनु भाकर महिलांच्या एअरपिस्तुल आणि 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात भाग घेत आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय नेमबाजी संघामध्ये ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, सिफ्ट कौर समरा, श्रेयांका सनदगी, अर्जुन बेबुटा, पृथ्वीराज तोंडईमन, अनंतजित सिंग नेरुका, रेझा धिलाँ यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे अनिष बनवाला, विजयवीर सिद्धू, इशा सिंग यांचीही निवड करण्यात आली आहे. या दोन स्पर्धांसाठी निवडण्यात आलेल्या 35 सदस्यांच्या भारतीय नेमबाजी संघाकरिता 14 मार्चपासून दिल्लीतील कर्निसिंग नेमबाजी संकुलात सरावाचे शिबिर आयोजित केले आहे. आता या नेमबाजांना भारताचे माजी ऑलिम्पिक पदक विजेते जसपाल राणाचे मार्गदर्शन लाभणार आहे.









