वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडात पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून भारतीय वंशाच्या रुबी ढल्ला बाहेर पडल्या आहेत. शुक्रवारी लिबरल पक्षाने त्यांना हे पद भूषविण्यासाठी अपात्र घोषित केल्यामुळे त्यांची पंतप्रधान होण्याची शक्यता संपुष्टात आली. रुबी ढल्ला यांनी निवडणूक खर्चासह एकूण 10 नियमांचे उल्लंघन केल्याचे पक्षाच्या मतदान समितीला चौकशीत आढळून आले आहे. ढल्ला यांनी आवश्यक असलेली निवडणूक आर्थिक माहिती उघड केली नव्हती. यासोबतच त्यांच्यावर चुकीच्या आर्थिक अहवालाचाही आरोप आहे. याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना हा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचे ढल्ला यांनी म्हटले आहे. तसेच रुबी ढल्ला यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत ते खोटे आणि बनावट असल्याचे म्हटले आहे. आपल्या वाढत्या पाठिंब्यामुळे पक्ष घाबरला आहे, असा दावा त्यांनी केला. रुबी ढल्ला ह्या वयाच्या 14 व्या वर्षापासून लिबरल पक्षासोबत काम करत आहेत.









