आगामी तीन महिन्यात पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन
कोल्हापूरः महेश तिरवडे
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्यावर्षी सरासरी चार वर्षाच्या तुलनेत ५९२१ मी मी पाऊस पडून या वर्षी राधानगरी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. अद्यापही धरण ७४ टक्के भरलेले आहे. धरणात पाणीसाठा १७५.३५ द ल घ मी इतका शिल्लक आहे, मात्र आगामी तीन महिन्याच्या काळात पाणी टंचाई भासू नये, म्हणून पाण्याचे योग्य नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
गेल्या वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात १५ जूनपासून पावसाला प्रारंभ झाला. साधारणपणे ४५ दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. गेल्या वर्षी पावसाचा जोर जून ते सप्टेंबर अखेर असल्याने सुमारे ६ वेळा काही दिवसाच्या अंतराने दरवाजे खुले झाले. त्यावेळी संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केले होते, त्यामुळे पूरपरिस्थितीला म्हणावे तसे सामोरे जावे लागले नाही,
राधानगरी धरणात २०२३ च्या तुलनेत २०२४ सालात २०५४ मि मी जादा पावसाची नोंद झाली होती. सध्या राधानगरी धरणातून पूर्वभागातील मागणीनुसार कमी अधिक प्रमाणात भोगावती नदी पात्रात सोडले जात आहे, तसेच गैबी बोगद्यातून काही वेळेस दूधगंगा धरणातून पाणी सोडले जाणार आहे. दोन्हीही धरणात पाण्याचे प्रमाण जादा असले तरी भोगावती व पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आगामी तीन महिन्याच्या काळात पाणी जपून वापरावे असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
( धरण क्षेत्रातील 6वर्षाची पावसाची नोंद)
वर्ष पाऊस मि मी
२०१९ ६९१२
२०२० ४५५६
२०२१ ४९४५
२०२२ ४४६७
२०२३ ३८६७
२०२४ ५९२१








