महानगरपालिकेचा पुढाकार : बी खाता नोंदणी लवकर उरकण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : अनधिकृत मालमत्तांची बी खात्याअंतर्गत महानगरपालिकेत नोंदणी करून घेतली जात आहे. हे काम तीन महिन्यांत उरकण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व 58 प्रभागामधील मालमत्तांची नोंद तातडीने व्हावी, यासाठी 40 डेटा एन्ट्री ऑपरेटर्सना स्वतंत्र कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच त्यांना बी खाता नोंदणी संदर्भात शुक्रवारी प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्याकडून माहिती देण्यात आली.राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा मालमत्ता आहेत. मात्र, त्यांची नोंद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नसल्याने तशा वसाहती व मालमत्तांना नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत.
त्याचबरोबर त्यांच्याकडून कर स्वरूपात सरकारला उत्पन्न मिळत नसल्याने अनधिकृत मालमत्तांची बी खाता अंतर्गत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन महिन्यांत नोंदणी करून घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागाकडून मालमत्तांची नोंदणी केली जात आहे. शुक्रवारी महापालिकेतील सर्व डेटा एन्ट्री ऑपरेटर्सना या संदर्भात प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी माहिती करून दिली. तसेच 40 डेटा एन्ट्री ऑपरेटर्सना स्वतंत्र 40 कॉम्प्युटर उपलब्ध करून देऊन 3 महिन्यांच्या आत बी खाता अंतर्गत नोंदणीचे काम पूर्ण केले जाणार आहे, असे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी सांगितले.









