कोल्हापूर / संतोष पाटील :
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनच्या मानांकनाप्रमाणे एका व्यक्तिस जगण्यासाठी 100 चौरस फुट जागा लागते. कोल्हापूरची आजची लोकसंख्या अंदाजे साडेआठ लाखांपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 66.82 चौरस किलोमीटर जागेपैकी फक्त 14.28 चौरस किलोमीटर क्षेत्र इतक्या सगळ्या लोकसंख्येला राहण्यासाठी उपलब्ध आहे. याच शास्त्राrय कारणाच्या आधारे हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.
शहरातील उपलब्ध जागेपैकी मिलीटरी, रेल्वे, एस.टी. रंकाळा, शहरातील एकुण रस्ते, आरक्षणे, पोलिस, देऊळ, विद्यापीठ, राजाराम कॉलेज, शेती, उद्यमनगर, जयंती व दुधाळी नाला, कोटीतीर्थ, बगीचे व स्टेडीयम, झोपडपट्टी क्षेत्र, न विकास क्षेत्र व रेड लाईन व ब्ल्यू लाईन यामुळे 66.82 पैकी अंदाजीत 14.28 चौरस किलोमीटर क्षेत्र 8.50 लाखांपेक्षा जास्त लोकांना उपलब्ध आहे. जे मानांकनानुसार अपुरे आहे.
शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना 1854 मध्ये झाली व अनेक स्थित्यंतरानंतर 1972 साली कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आली. 1871 साली शहराचे केंद्र अंदाजे एक किलोमिटर होते व त्यावेळी लोकसंख्या 37,662 होती. 1941 साली शहराचे क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर झाले म्हणजे 1871 ते 1946 पर्यंत कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली, मात्र 1946 ते आजपर्यंत हद्दवाढ झालेली नाही. 1946 साली रेड झोन, ब्ल्यून झोन, पूर रेषा नव्हत्या. त्यावेळी आरक्षणे नव्हती. सद्यस्थिती इतकी सरकारी व शासकीय इमारती नव्हत्या व विकास आराखडाही नव्हता. त्यामुळे 25 ते 30 चौरस किलोमीटर जागा व्यापली गेली आहे. त्यामध्ये रहिवास होऊ शकत नाही. म्हणजेच 8.50 लाख लोकसंख्या ही जेमतेम 30 चौरस किलोमीटर परिसरात राहते. जे शास्त्राrय मानांकनाप्रमाणे चुकीचे असून, राज्यघटनेने जे मुलभूत अधिकार दिले आहेत. त्यांना छेद देणारे आहे. शासनाला वेळोवेळी एफएसआय वाढवून देणे भाग पडत आहे. खरे म्हणजे टाऊन प्लॅनिंगच्या शास्त्राप्रमाणे शहराची उभी वाढ योग्य नाही.
2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 5, लाख 58 हजार इतकी आहे. 1946 ला शहराची लोकसंख्या अंदाजे 12 हजार 122 होती. ती आता अंदाजे साडेआठ लाख तसेच कामानिमित्त शहरात येणारे फ्लोटींग पॉप्युलेशन असे मिळून साडेदहा लाख लोकसंख्या त्याच जुन्या 66.82 चौरस किलोमीटर हद्दीमध्ये राहतात. त्यामुळेच आरक्षित व अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी राखीव क्षेत्र 52.54 चौरस किलोमीटर असून त्यापैकी रहिवास तथा वाणिज्य वापरासाठी उपलब्ध क्षेत्र अंदाजीत 14.28 चौरस किलोमीटर आहे. शहराची वाढती लोकसंख्या, फ्लोटींग लोकसंख्या सुमारे दोन लाख लोकसंख्येचा विचार करता अर्बन अँड रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन फॉम्युर्लेशन अँड इम्प्लिमेशन गाईडलाईन नुसार हद्दवाढ होणे आवश्यक असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
- योजनांचा लाभ नाही
शासनाने सोलापूर (98.67 चौ.कि.मी.), नांदेड (63.22 चौ.कि.मी.), नाशिक (259.13 चौ.कि.मी.) या महानगरपालिकांची हद्दवाढ यापुर्वी केल्याने त्यांच्या लोकसंख्येतही वाढ झाली. त्यामुळेच शहरांचा समावेश केंद्राचे स्मार्ट सिटी योजनेचा लाभ मिळालेला आहे. महापालिकेची हद्दवाढीचा प्रस्ताव 1990 पासून वेळोवेळी शासनास प्रस्तावित केलेला होता. परंतु 66.82 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये कोणतीही वाढ न झाल्याने केंद्राच्या स्मार्ट सिटीसह इतर योजनांना शहर मुकले.
- तर चार लाख लोकसंख्या वाढेल
नव्या हद्दवाढीच्या प्रस्तावात 18 गावांसह दोन एमआयडीसींचा समावेश करावा असा प्रस्ताव तयार केला आहे. या गावातील प्रस्तावित लोकसंख्या चार लाख 47 हजार इतकी आहे. ही लोकसंख्या शहरात आल्याने कोल्हापूर महापालिकेला केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकसंख्येच्या निकषानुसार मिळणाऱ्या कोट्यावधी निधीचा लाभ होणार आहे.
ठिकाण क्षेत्र अंदाजीत (हेक्टर मध्ये)
1 मिलीटरी एरिया…… 120,00
2 रेल्वे, एस.टी. स्टैंड (परिवहन)…. 314.75
3 रंकाळा तलाव….. 135.00
4 शहरातील एकुण रस्ते (प्रस्तावित)…. 135.00
5 आरक्षणे….. 385.00
6 पोलिस, देऊळ, विद्यापीठ, राजाराम कॉलेज….. 903.58
7 उद्यमनगर……. 147.88
8 जयंती व दुधाळी नाला, कोटीतीर्थ तलाव…… 130.88
9 स्टेडियम (बगीचा, आयलँड इ.)….. 125.00
10 झोपडपट्टी क्षेत्र…… 52,00
11 शेती तथा ना विकास क्षेत्र……. 2478.68
12 बफर झोन……. 78.50
13 रेड लाईन व ब्ल्यू लाईन बाधीत क्षेत्र…… 248.50
14 सार्वजनिक प्रयोजनासाठी राखीव क्षेत्र……. 52.54
15. महापालिका एकूण क्षेत्र निव्वळ रहिवास– वाणिज्य क्षेत्र……. 14.28








