पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य : सर्वश्रेष्ठ नेतृत्वाची गरज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत मंडपममध्ये स्कूल ऑफ अल्टीमेट लिडरशिप (एसओययुएल) कॉन्क्लेव्हच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन शुक्रवारी केले. यावेळी भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे देखील उपस्थित होते. आज प्रत्येक भारतीय 21 व्या शतकातील ‘विकसित भारता’साठी दिवसरात्र काम करत आहे. अशा स्थितीत 140 कोटींच्या देशात प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक वर्टिकलमध्ये, जीवनाच्या प्रत्येक पैलूत आम्हाला उत्तमातील उत्तम नेतृत्वाची गरज असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
काही आयोजनं ही मनात ठाण मांडून बसतात, आजचा कार्यक्रम देखील अशाच प्रकारचा आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी उत्तम नागरिकांचा विकास आवश्यक आहे. व्यक्ती निर्मितीतून राष्ट्र निर्मिती, ‘जन से जगत’ कुठल्याही उंचीला प्राप्त करण्याचा आरंभ जनपासूनच होतो असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
प्रभावी नेत्यांचा विकास आवश्यक
प्रभावी नेत्यांचा विकास आवश्यक आहे आणि याचमुळे ‘स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिपची स्थापना विकसित भारताच्या विकास यात्रेत एक महत्त्वपूर्ण आणि मोठे पाऊल आहे. स्वामी विवेकानंद भारताला पारतंत्र्यातून बाहेर काढत भारताला ट्रान्सफॉर्म करू इच्छित होते. जर 100 नेते आमच्याकडे असतील तर केवळ भारताला स्वतंत्र नव्हे तर जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरवू शकतो असा विश्वास त्यांना होता. त्यांचा हाच मंत्र घेऊन आम्हा सर्वांना वाटचाल करायची असल्याचे मोदी म्हणाले.
सर्व क्षेत्रांमध्ये भारताचा प्रभाव
आज प्रत्येक भारतीय 21 व्या शतकातील विकसित भारतासाठी दिवसरात्र काम करत आहे. अशा स्थितीत 140 कोटीच्या देशात देखील प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक व्हर्टिकलमध्ये, जीवनाच्या प्रत्येक पैलूत उत्तमातील उत्तम नेतृत्वाची गरज आहे. आगामी काळात जेव्हा आम्ही कूटनीतिपासून टेक इनोव्हेशनपर्यंत एका नव्या नेतृत्वाला पुढे करू तेव्हा सर्व क्षेत्रांमध्ये भारताचा प्रभाव अनेकपटीने वाढणार आहे. म्हणजेच एकप्रकारे भारताचे पूर्ण व्हिजन आणि भविष्य एका मजबूत नेतृत्व पिढीवर निर्भर असेल, याचमुळे आम्ही जागतिक विचारसरणी आणि स्थानिक पालनपोषणासोबत पुढे जाऊ इच्छितो असे मोदींनी नमूद केले आहे.
संघटन विकास
जर आम्ही स्वत:ला विकसित करू शकलो तर वैयक्तिक यशाचा अनुभव मिळवू शकतो. परतु एक टीम विकसित करू शकलो तर संघटनेचा विकास अनुभवू शकतो. नेत्यांना विकसित करू शकलो तर आमचे संघटन अत्यंत जलदगतीने प्रभावी विकास करू शकते. आम्हाला आमच्या शासन आणि धोरणनिर्मितीला जागतिक दर्जाचे करावे लागणार आहे. आमचे धोरण निर्माते, अधिकारी, उद्योजक जागतिक प्रणालीशी जोडून स्वत:ची धोरणे तयार करू लागले तरच हे शक्य आहे. जर आम्हाला विकसित भारत साकार करायचा असेल तर आम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये वाटचाल करावी लागणार आहे. आम्हाला केवळ उत्कृष्टतेची आकांक्षा करावी लागणार नसून ती प्राप्तही करावी लागणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
भूतानच्या पंतप्रधानांचे संबोधन
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये ‘स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप’ संमेलनाचे उद्घाटन झाल्यावर मुख्य भाषण भूतानचे पंतप्रधान दासो शेरिंग तोग्बे यांचे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मी ज्येष्ठ बंधूची प्रतिमा पाहतो, मोदी हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात, मदत करतात. लीडरशिपचे मी धडे गिरविलेले नाहीत. याचमुळे जागतिक नेते नरेंद्र मोदींकडून नेतृत्वाविषयी मी शिकू इच्छितो असे उद्गार भूतानच्या पंतप्रधानांनी काढले आहेत. दोन दिवसांच्या या संमेलनात राजकारण, क्रीडा, कला, मीडिया, अध्यात्मक, लोकनीति, व्यापार आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित दिग्गज स्वत:च्या यशाची गाथा सादर करणार आहेत.









