कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
सुमारे दहा कोटी रुपये खर्चून संभाजीनगर बसस्थानकाची अत्याधुनिक इमारत उभारली आहे. बसस्थानकातील प्रशस्त जागेमुळे बसेसच्या पार्किंगचीही सोय होणार आहे. बसस्थानकाचे संपूर्ण काम पूर्ण होऊन दहा महिने झाले आहेत. मात्र महापालिकेच्या टीपी विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. यामुळे संभाजीनगर बसस्थानकाची ही नवीन इमारत वापराविना धूळखात आहे.
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासह संभाजीनगर बसस्थानकही महत्वाचे आहे. या बसस्थानकातून राधानगरी तसेच कोकणात जाणाऱ्या बसेसची ये जा होते. संभाजीनगर बसस्थानकाची जागा सात एकरापेक्षा अधिक आहे. येथील बसस्थानकाची इमारत जुनी झाली होती. यामुळे नवीन अत्याधुनिक इमारत उभारण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात तत्कालिन परिवहन राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी संभाजीनगर बसस्थानक आणि जोतिबा येथील बसस्थानकासाठी 11 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर करून आणला. यामध्ये संभाजीनगर बसस्थानक विस्तारीकरणासाठी सुमारे 9 कोटी 80 लाख रुपये मंजूर आहेत. या निधीतून संभाजीनगर बसस्थानकाची नवीन उभारण्यात आली. मे 2024 मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले. आता प्रतीक्षा आहे इमारतीच्या वापराची. महापालिकेच्या टीपी विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले की इमारतीच्या वापरास सुरुवात होईल. भोगवटा प्रमाणपत्रासाठी एसटी प्रशासनाकडून टीपी विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. पण भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्याची एसटी प्रशासनाची तक्रार आहे.
- प्रवाशांची गैरसोय
संभाजीनगर बसस्थानक दोन वर्षापासून बंद आहे. यामुळे संभाजीनगर पेट्रोल पंपाच्या चौकात उभा राहून प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
संभाजीनगर बसस्थानक आगाराची जागा – 4.69 एकर
बसस्थानकाची जागा– 7.21 एकर
विस्तरीकरणासाठी निधी-9 कोटी 80 लाख
विस्तरीकरणाच्या कामाला मंजूरी -2020
बसस्थानक इमारतीचे काम सुरू– 16 नोव्हेंबर 2022
काम पूर्ण– मे 2024
- नवीन बसस्थानकामधील सुविधा
प्रवासी प्रतीक्षालय, बसस्थानक प्रमुख केबिन, बसस्थानक कर्मचारी रूम, पास व रिझर्वेशन रुम, चालक व वाहक रेस्टरूम (पुरुष), महिला कर्मचारी रेस्ट रूम, कॅन्टीन, पार्सल रूम, जेनेरिक औषधालय, प्रवासी स्वच्छतागृह पुरुष, प्रवासी स्वच्छता गृह महिला, हिरकणी कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, शॉप्स अनलोडिंग प्लॅटफॉर्म, कपाऊंड, वॉल पार्किंग व्यवस्था
- भोगवटा प्रमाणपत्र मिळाले की वापर सुरु
संभाजीनगर बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी महापालिकेच्या टीपी विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पण भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय इमारतीचा वापर सुरु करता येत नाही.
शिवराज जाधव, विभाग नियंत्रक, कोल्हापूर








