पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं बिगुल वाजलं. अपेक्षित होतं की पाकिस्तान निसटता का होईना विजय मिळवेल. परंतु आपल्याच देशात बऱ्याच वर्षानंतर आयसीसी क्रिकेटचे यजमानपद मिळाल्यानंतर त्याची सुऊवात धडाकेबाज करता आली नाही हे पाकिस्तानचे दुर्दैवच म्हणावं लागेल. गंमत बघा, वेस्ट इंडीज, श्रीलंका खराब कामगिरीमुळे या स्पर्धेत नाहीयत. तीच गत जवळपास पाकिस्तानची होती. परंतु नियमाप्रमाणे जो संघ यजमान असतो तो संघ अप्रत्यक्षरीत्या स्पर्धेसाठी पात्र ठरतो. जसा काही दिवसांपूर्वी टी-20 साठी अमेरिका पात्र ठरला होता अगदी तसा. स्पर्धेचा श्रीगणेशा पाकिस्तानने पराभवाने केला. या स्पर्धेचा विचार केला तर मी पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे ही स्पर्धा जवळपास बाद फेरीसारखी आहे. स्पर्धेतील तीन सामन्यातील दोन पराभव स्पर्धेच्या बाहेर जाण्यासाठी पुरेसे आहेत. त्यातच यजमानांची सुऊवात पराभवाने होत असेल तर मात्र ही फार मोठी शोकांतिका असेल. या स्पर्धेत कुठल्याही संघासाठी पहिला विजय दोन पावलं पुढे टाकणारा आहे तर पहिला पराभव एक-दोन नव्हे तर तब्बल दहा पावले मागे टाकणारा असेल.
मला आठवतं मी ज्यावेळी शाळेत परीक्षा द्यायचो आणि विशेषत: विज्ञानाचा आणि इतिहासाचा पेपर असला की सुऊवातीला गाळलेल्या जागा भरा आणि जोड्या लावा हे प्रश्न असायचे. जे विद्यार्थ्याला हमखास गुण देऊन जायचे. परंतु या प्रश्नात अडखळलात की त्याचा परिणाम पूर्ण गुणांवर होतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील छोट्या ग्रुपमधील पहिला सामना प्रत्येक संघासाठी गाळलेल्या जागा आणि जोड्या लावासारखा आहे. इथे जर तुम्ही फसलात, अडखळलात तर त्याचा दबाव दुसऱ्या प्रश्नावर किंबहुना दुसऱ्या सामन्यात येतो. नेमकं तेच पाकिस्तानच्या बाबतीत घडतंय. किंबहुना आपल्या ग्रुपमध्ये भारतीय संघाचा समावेश आहे, याचा विसर कदाचित त्यांना झाला असावा.
पहिल्या 40 षटकात पाकिस्तान स्वार झाला होता. परंतु शेवटच्या 10 षटकात त्यांची तलवार म्यान झाली. अखेरच्या दहा षटकात तब्बल 110 धावा कुटल्या गेल्या. अगदी त्याच्या विऊद्ध पाकिस्तानच्या पहिल्या 10 षटकात जेमतेम 20 ते 22 धावा होत्या. क्रिकेटमध्ये एखाद्या संघावर संकटं आली की ती चारी बाजूने येतात. याची प्रचिती काल पाकिस्तानच्या रिझवानने घेतली असावी. गोलंदाजांकडून खराब कामगिरी झाल्यानंतर जी जखम झाली होती त्यावर मलम न लावता त्यांच्या फलंदाजांनी मीठ चोळण्याचे काम केलं. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हिरो फखर झमान जखमी झाल्यामुळे 20 ते 25 मिनिटे खेळपट्टीवर उशिरा येणे बंधनकारक झालं. त्यातच खेळपट्टीवर बाबर आझमसोबत धावा धावून काढणं हे जिकिरीचं होऊन बसलं. दुसरीकडे किवींच्या फलंदाजांनी जी ‘विल’ पॉवर दाखवली त्याचे निश्चितच कौतुक करावं लागेल. या स्पर्धेत नेट रनरेट प्रत्येक संघासाठी महत्त्वाचे आहे. पाकिस्तानने हा सामना तब्बल 60 धावांनी गमावला. त्यामुळे त्यांचं रनरेट कमालीचे खालावलेलं असेल यात शंका नाही.
आयसीसी ज्या ज्या वेळी आयसीसी क्रिकेट इव्हेंटचे यजमानपद देते त्यावेळी क्रिकेटचा प्रसार आणि त्या देशाचे अर्थकारण बदलावं हीच माफक अपेक्षा असते. परंतु हे अर्थकारण बदलण्यासाठी त्या संघाला कमीत कमी स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आता आपण पाकिस्तानकडे नजर टाकली तर दुसऱ्या सामन्यात जर भारताने पाकिस्तानला लोळवलं तर पाकिस्तानची काय दशा होईल, याची कल्पना न केलेली बरी. त्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान जो पंतप्रधान पदासाठी आसुसलेला आहे त्याने जर हा खेळ बघितला तर मात्र तो ढसाढसा रडेल. क्रिकेटमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला भारत देश सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात नाही. त्यातच पाकिस्तान उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला नाही तर मात्र पाकिस्तानी जनता आपल्या क्रिकेटपटूंची लक्तरे वेशीवर टांगायला मागेपुढे बघणार नाही हेही तेवढेच खरं. आयसीसी क्रिकेटच्या मोठ्या इव्हेंटमध्ये योगायोगाने किंवा जाणूनबुजून नेहमीच भारत, पाकिस्तान या संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यामागे प्रचंड अर्थकारण आहे हे लपून राहिले नाही. भारत-पाकिस्तानच्या एका मॅचमधून इव्हेंटच्या एकूण महसुलापैकी एक चतुर्थांश महसूल या सामन्यातून मिळतो. भारत आणि पाकिस्तान हे संघ लीगपर्यंत अडकले तर किती नुकसान होऊ शकते ते तुम्ही वेस्टइंडीजला विचारा. 2007 मध्ये तर भारत आणि पाकिस्तान यापैकी एकही संघ उपांत्य फेरीपर्यंत न पोहोचल्यामुळे बऱ्याच जणांनी आपले प्रायोजकत्व मागे घेतलं होतं. असो. एकंदरीत पाकिस्तान क्रिकेट संघ कमालीचा अडचणीत आलाय. सोबत पाकिस्तानी संघाने आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणलं, असं म्हटलं तरी वावग ठऊ नव्हे.
चित्रपटात पटकथा ही ठरलेली असते. सर्वसाधारण ती नायकाच्या बाजूने असते. परंतु क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला सामन्यात जर पटकथा लिहायची असेल तर फलंदाज किंवा गोलंदाजांना उच्चस्तरीय प्रदर्शन करावचं लागतं. अन्यथा मोक्याच्या क्षणी टुकार अभिनयाने बॉक्स ऑफिसवर चित्रपट गडगडावा तसा सामना गडगडतो. याचं प्रत्यनंतर काल पाकिस्तानला आला नसेल तरच नवल! थोडक्यात काय तर पाकिस्तानसाठी रात्र वैऱ्याची आहे एवढं मात्र खरं!









