ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स यांच्यावतीने सोनतळी – कोल्हापूर येथे डिसेंबर २०२४ मधे घेण्यात आलेल्या स्काऊट – गाईडच्या राज्य परीक्षेत माडखोल धवडकी शाळा नं. २ चा माजी विद्यार्थी व सध्या माडखोल माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु. श्रेयस वसंत पानोळकर याने दैदिप्यमान यश मिळवत राज्य पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. माडखोल धवडकीच्या इतिहासातील ही पहिलीच सर्वोत्तम शैक्षणिक कारकिर्द आहे.कु. श्रेयस वसंत पानोळकरच्या या यशामुळे माडखोल धवडकी चे नाव उंचावले आहे. श्रेयसने इ. ५ वी पासून माडखोल धवडकी शाळेत आपला स्काऊट – गाईडचा अभ्यासक्रम पूर्ण करून कोल्हापूर येथे ही परीक्षा दिली होती. त्याच्या या यशाचा सन्मान राज्यपालांच्याहस्ते होणार आहे. तसेच श्रेयस आता राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेसाठीही पात्र ठरला आहे. श्रेयसला माडखोल धवडकी शाळेचे स्काऊट शिक्षक अरविंद सरनोबत यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर व शाळेच्या सर्व कमिट्यांचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.









