दोन्ही कुत्रे नव्याने बाळगण्यास बंदी : सध्या असलेल्यांची नोंदणी आवश्यक
पणजी : रॉटविलर व पिटबुल या हिंस्र श्वानांवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कायद्यात आवश्यक ती दुरूस्ती करून बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. लहान मुलांसह इतरांवर रॉटविलर व पिटबुल कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनानंतर या जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याची मागणी राज्यात होत होती. या मागणीला अनुसरून बंदी घालण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रॉटविलर व पिटबुल जातीची कुत्री ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी कुत्र्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नवीन कुत्रे आयात करण्यावर मात्र बंदी घातली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. नोंदणीनंतर राज्यात रॉटविलर आणि पिटबुल जातीचे कुत्रे कोठे आहेत व किती आहेत, याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच आयातीवर बंदी घातल्याने त्यांची संख्या आणखी वाढणार नाही, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या उर्वरित मुलांनाही नोकरी
स्वातंत्र्यसैनिकांची 60 ते 70 मुले आजही नोकरीपासून वंचित असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. जी मुले नोकऱ्यांपासून वंचित आहेत, त्यांना कायमस्वऊपी सरकारी नोकरीवर घेण्यात येणार आहे. काहीजणांना मनुष्यबळ विकास महामंडळात नोकऱ्या देण्यात येत होत्या. परंतु त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. यापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्या देण्याच्या बाबतीत काही त्रुटी होत्या. एकेका घरात तीन तीन सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत. आता यावर माझे स्वत: लक्ष आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.









