सुटकेसाठी 5 कोटीच्या खंडणीची मागणी : राजापूर-मुडलगी येथील व्यावसायिक
बेळगाव : राजापूर (ता. मुडलगी) येथील एका रियल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी त्याच्या सुटकेसाठी 5 कोटी रु. खंडणी मागितली असून यासंबंधी घटप्रभा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी तीन पथके कार्यरत असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. बसवराज निलप्पा अंबी (वय 48) रा. राजापूर, ता. मुडलगी असे अपहरण झालेल्या रियल इस्टेट व्यावसायिकाचे नाव आहे. बसवराजची पत्नी शोभा यांनी मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी घटप्रभा पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली आहे. घटनेनंतर पाच दिवसांनी एफआयआर दाखल केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली. बसवराज हे कार दुरुस्तीसाठी सांगलीला गेले होते. 14 फेब्रुवारी रोजी रात्री शिरगुप्पीजवळील एका ढाब्यावर जेवण घेऊन राजापूरला जाताना दंडापूरजवळ कार अडवून त्यांचे अपहरण करण्यात आले आहे.
अपहरणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बसवराजच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीला एक कॉल आला. स्वत: बसवराजनी आपले अपहरण झाले आहे, अपहरणकर्ते 5 कोटी रुपये मागत आहेत, पण माझी सुटका करून घ्या, असे सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी 15 रोजी बसवराजच्या मुलाने सुमारे 10 लाख रुपये असलेली एक बॅग घेऊन अपहरणकर्त्यांनी निपाणीजवळील ज्याठिकाणी पैसे देण्यास सांगितले होते त्या ठिकाणावर पोहोचला. पैसे घेण्यासाठी अपहरणकर्ते मात्र तेथे पोहोचले नाहीत. त्या दिवशी रात्री पुन्हा फोन आला. पैसे घेऊन आम्ही एकट्याला यायला सांगितले होते. तुम्ही सोबत इतरांना का आणला? अशी विचारणा केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावण्यात आले. पूर्णपणे पैसे पोहोचले नाहीत तर बसवराजचा खून करू, अशी धमकीही अपहरणकर्त्यांनी दिली. दरम्यान, पोलिसांना अपहरणकर्त्यांचा सुगावा लागला असून यापैकी काही जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.
अपहरणकर्त्यांचा वावर निपाणी परिसरातच अधिक
प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गोकाक व चिकोडी पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके नियुक्त केली आहेत. अपहरणकर्त्यांचा वावर निपाणी परिसरातच अधिक प्रमाणात दिसून आला आहे, असेही जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.









