कोल्हापूर :
वारकऱ्यांनी केलेला टाळ–मृदुंगाचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा गजर, घोड्यावर स्वार बाल शिवाजी, राजमाता जिजाऊ अन् मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी बालचमू, युवक, युवती, चित्तथरारक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, आकर्षक विद्युत रोषणाई, साऊंड सिस्टीमवर शिवरायांची शौर्यगाथा सांगणारे पोवाडे, आबालवृद्धांची अलोट गर्दी अन् जय भवानी… जय शिवाजी…चा अखंड जयघोष करत शहरातील प्रमुख मार्गावरुन शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली.
शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त गेले चार दिवस विविध सामाजिक उपक्रम सुरु आहेत. बुधवारी सकाळी शिवजन्मकाळ सोहळा उत्साहात झाला. यानंतर सायंकाळी 6 वाजता उभा मारुती चौक येथून शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ झाला. निवृत्ती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीचे उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, कालीचरण महाराज प्रमुख उपस्थित होते.
उभा मारुती चौक येथून पुढे बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, कोळेकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी रोड, बिंदू चौक, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी मार्गे पुन्हा उभा मारुती चौक येथे रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीमध्ये आर. के. पोवार, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, रविकिरण इंगवले, महेश जाधव, सचिन चव्हाण, वसंतराव मुळीक, रवींद्र चव्हाण, अॅड. धनंजय पठाडे आदींसह शिवाजी पेठेतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके
पेठेतील मर्दानी खेळांच्या आखाड्यातील मावळे, रणरागिणी यांनी मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. लाठी–काठी, दांडपट्टा, तलवार अशा शस्त्रांद्वारे केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
- मुलींच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष
मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मुलींच्या लेझीम पथकाने साऱ्यांचे लक्ष वेधले. हलगीच्या ठेक्यावर मुलींनी लेझीमच्या विविध चालींचे सादरीकरण केले. भगवे, पांढरे कुर्ते, डोक्यावर फेटा अशा पारंपरिक पेहरावातील हे मुलींचे पथक लक्षवेधी ठरले.
- महिला, युवतींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग
महिला, युवतीही मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. भगवी साडी, डोक्यावर फेटा असा पारंपरिक पेहराव त्यांनी परिधान केला होता. मिरवणूक मार्गावर त्यांच्याकडून जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात येत होता.
- पारंपरिक वाद्यांचा गजर
मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आला. धनगरी ढोल पथकाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. तुतारीच्या निनादाने चैतन्याचे वातावरण निर्माण केले. तर वारकरी संप्रदायाच्या टाळ–मृदुंगाच्या निनादात सारे दंग झाले.
- शहरातील प्रश्नांवर वेधले लक्ष
मिरवणुकीमध्ये रिक्षावर लावलेल्या डिजिटल फलकाच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नांवर लक्ष वेधले. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, शाळा, महाविद्यालयांची मैदाने ओपन बार करु नका, असा संदेश या फलकांच्या माध्यमातून देण्यात आला.








