आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत लिंबू टिंबू संघाचे काय काम हा मला नेहमीच प्रश्न भेडसावतो. उदाहरणच द्यायचं झालं तर सुऊवातीच्या काळात झिम्बाब्वे, स्कॉटलंड, बांगलादेश हे सर्व देश आलेच. परंतु या संघात खऱ्या अर्थाने जर कुठल्या संघाने आपल्या भारतीय संघाचा फेस काढला असेल तर तो आहे बांगलादेश.
माझ्या मागील तीस वर्षाच्या क्रिकेटच्या समालोचनातील कारकिर्दीत काही आंतरराष्ट्रीय सामन्यांनी बऱ्याच जखमा दिल्या आहेत. शारजातील मियांदादचा ’तो ’ षटकार. 1987 मध्ये चेपॉकला ऑस्ट्रेलियाविऊद्ध मनिंदर सिंगने पायावर घेतलेला तो चेंडू आणि कांगारूविऊद्ध टाय झालेला तो सामना. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविऊद्ध मार्टिन गप्टीलची सीमारेषेवरून आलेली ती अचूक फेक आणि धोनी धावबाद होताच अंतिम फेरीत पोहोचण्याचं भंगलेलं ते स्वप्न. पण या सर्व यादीत जास्त जखम झाली ती 2007 मधील विश्वचषक स्पर्धेत. त्यावेळच्या नवख्या बांगलादेश संघाने आपल्याला लोळवलच नाहीतर एखाद्या दुधाच्या कपात माशी पडल्यानंतर ती माशी आपण अगदी अलगद बाहेर काढतो त्याप्रमाणे बांगलादेशने स्पर्धेत आपल्याला अलगद बाहेर काढलं आणि होत्याचं नव्हतं करून टाकलं. आजवरच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात खराब कामगिरी म्हणजे बांगलादेशfिवऊद्धचा तो मानहानिकारक पराभव. काही पराभव असे असतात तुम्ही कितीही विसरण्याचा प्रयत्न केलात तरी ते विसरता येत नाहीत. एखाद्याचा विवाह झाल्यानंतर कालांतराने त्याला त्याचं पहिलं प्रेम लपवता येत नाही अगदी तसा हा पराभव होता. पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघ जवळपास एक वर्ष मानसिक दबावाखाली होता. सात जन्माचा वैरी असावा तसा बांगलादेश त्या स्पर्धेत खेळला. थोडक्यात काय लाजिरवाणा या शब्दाला लाजेने मान खाली घालावा लागेल असा तो पराभव होता. तो सामना आपणास फार मोठी भळभळती जखम देऊन गेला होता. ज्यावेळी आयसीसीची मोठी स्पर्धा होते त्यावेळी बांगलादेश संघ समोर आला की ती जखम माझ्या डोळ्यासमोर येते.
या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे आज आपली लढत बांगलादेशविऊद्ध आहे. हा संघ बलवान आहे का तर मुळीच नाही. परंतु शेअर मार्केटमध्ये कधी कधी अचानक उसळी बघायला मिळते तशीच उसळी या सामन्यात सुद्धा बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या राजकारणात फार मोठी उलथापालथ झाली. तशीच काहीशी उलथापालथ त्यांच्या संघामध्ये बघायला मिळते. काही नवे चेहरे त्यांच्या संघात आहेत.
दुबईतील खेळपट्टी ही थोडी वेगळी आहे. येथील हवामान नेहमीच उकाड्याचे राहिले आहे. पण मागील दोन दिवसापासून येथील हवामान थोडंसं थंड झालं आहे. याचा फायदा भारतीय गोलंदाजांनी उचलायलाच हवा. ‘बुमराह है तो मुमकिन है!’ या वाक्याला छेद देत शमी, अर्शदीप सिंग यांना गोलंदाजी करावी लागेल. भारत-बांगलादेश या सामन्यापेक्षा दुबईत भारत-पाकिस्तान या सामन्याची चर्चा जास्त आहे आणि ती असणे स्वाभाविकच आहे.
परंतु भारताला सुऊवात बांगलादेशला धोबीपछाड देऊन करायची आहे. बांगलादेशी खेळाडू कागदावरच वाघ राहिले पाहिजेत, त्यांचं रौद्ररूप मैदानात नको, याची दक्षता टीम इंडियाने घेतली पाहिजे. 2007 मधील तो सामना पराभूत झाल्यानंतर रात्रभर मी डोळे चोळत बसलो होतो. धो धो पावसात जीर्ण झालेल्या इमारती जशा कोसळतात तसा भारतीय संघ कोसळला होता. क्रिकेटमध्ये दोन अधिक दोन चार होत नाहीत. ते कधी तीन असतात तर कधी पाच हे त्या सामन्याने जगाला दाखवून दिले होते. अर्थात त्या पराभवाने विश्वचषकातील अर्थकारण किती कोलमडलं होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. असो. 2007 मधील बांगलादेशविऊद्धची ती जखम मागील काही वर्षात बांगलादेशविऊद्धच्या विजयाने काही प्रमाणात भरून निघाली आहे. आज बांगलादेशविऊद्ध विजय मिळवेत ’ती’ जखम कायमची भरून काढायची आहे एवढं मात्र खरं.!









