बिहारच्या तीन कामगारांना अटक
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत मूळची ओडिशाची असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी बिहारच्या तीन कामगारांना तिरुपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. या आरोपींची 17 फेब्रुवारी रोजी रात्री तिरुपूर रेल्वेस्थानकावर पीडिता, तिचा पती आणि मुलासोबत भेट झाली होती.
हा परिवार तामिळनाडूतून ओडिशात परतत होता, कारण कोइम्बतूरमध्ये त्यांना त्यांच्या पसंतीचे काम मिळत नव्हते. बिहारच्या तीन मजुरांनी या परिवाराला कारखान्यात काम मिळवून देण्याचे प्रलोभन देत महिला, तिचा पती आणि मुलाला स्वत:च्या राहत्या ठिकाणी नेले होते.
त्याच रात्री आरोपींनी चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. तिरुपूर पोलिसांनी प्रारंभिक तपासानंतर तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करविण्यात आली आहे. सामूहिक बलात्काराच्या घटनेप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.









