हुतींची समजूत काढण्याचा प्रयत्न : निमिशा प्रियाचा वाचणार जीव
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणने पुन्हा एकदा भारतासोबतची दृढ मैत्री निभावली आहे. भारतीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या विनंतीनंतर इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघची यांनी येमेनच्या हुती बंडखोरांच्या वरिष्ठ दूतासमोर भारतीय नर्स निमिशा प्रियाचा मुद्दा उपस्थित केला आहे. 37 वर्षीय निमिशला येमेनमधील बिझनेस पार्टनरच्या हत्येसाठी 2020 मध्ये दोषी ठरविण्यात आले होते. तसेच तिला येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मृत्युदंड ठोठावण्यात आला आहे.
जयशंकर यांनी ओमानची राजधानी मस्कतमध्ये इराणच्या विदेश मंत्र्यांना हुती बंडखोरांशी चर्चा करण्याची विनंती केली होती. इराण आणि हुती बंडखोरांदरम्यान अत्यंत चांगले संबंध आहेत. इस्रायल विरोधातील लढाईत दोघेही एकत्र आहेत. इराणच हुतींना शस्त्रास्त्र पुरवठा करणारा प्रमुख देश आहे.
हुतींचे विशेष प्रतिनिधी अंसार अल्लाह यांच्याशी तत्काळ चर्चा केली. आम्ही याप्रकरणी आशावादी आहोत. अब्दुल्ला सलाम यांच्याशी देखील भारतीय नर्सप्रकरणी चर्चा केली आहे. या दिशेने मार्ग काढण्याकरता प्रयत्न करू असे आश्वासन हुती प्रतिनिधीने दिले असल्याचे इराणचे विदेशमंत्री अराघची यांनी सांगितले आहे.
इराणच्या विदेश मंत्र्यांचा सल्ला
इराणचे विदेशमंत्री आणि हुती प्रतिनिधीची बैठक मस्कत येथे झाली आहे. यात गाझा शस्त्रसंधी समवेत क्षेत्रीय घडामोडींवर चर्चा झाली आहे. तर 37 वर्षीय निमिशा प्रिया ही केरळची रहिवासी आहे. येमेनमधील बिझनेस पार्टनरची हत्या करण्याचा आरोप तिच्यावर आहे. येमेनमधील पार्टनरने निमिशाचा अनेक वर्षांपर्यंत छळ केला होता असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. निमिशाचे कुटुंबीय तिला वाचविण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभियान राबवत आहेत.
निमिशाचे कुटुंबीय मृत्युदंडापासून तिला वाचविण्यासाठी ब्लडमनी देखील एकत्र करत आहेत. याप्रकरणी शक्य ती सर्व मदत करत आहोत असे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. भारत सरकार याप्रकरणी कूटनीतिक प्रयत्न जारी ठेवून असल्याचे इराणच्या विदेश मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे. इराणने स्वत:च्या प्रभावाचा वापर करत हुतींची समजूत काढून निमिशाची मुक्तता करावी अशी भारताची इच्छा आहे.
याप्रकरणी पर्यायी कायदेशीर युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला जात नाही तोवर हे निकालात काढता येणार नाही. हे पूर्णपणे कायदेशीर प्रकरण असून याचे राजकारणाशी कुठलेच देणेघेणे नाही असे इराणच्या विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे.









