वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरु असलेल्या महिलांच्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत युपी वॉरियर्स संघाकडून खेळणारी लंकेची कर्णधार आणि सलामीची फलंदाज चमारी अटापट्टू हिला या स्पर्धेतील अंतिम टप्प्यात खेळता येणार नाही. लंका आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील वनडे मालिका 4 मार्चपासून सुरु होत आहे. या मालिकेसाठी तिची लंकन संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लंका आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघामध्ये 3 सामन्यांची वनडे आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. चमारी अटापट्टू 26 फेब्रुवारीपर्यंत महिलांच्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेसाठी उपलब्ध राहिल. अटापट्टूची उणिव युपी वॉरियर्सना चांगलीच भासेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिली दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकली नाही.









