छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे औचित्य
ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी १९ फेब्रुवारी रोजी फुकेरी हनुमंत गड, विलवडे छत्रपती शिवाजी अश्वारूढ पुतळा, ओटवणे तसेच सातुळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग हिंदुस्थान आणि फुकेरी येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळाच्या वतीने फुकेरी हनुमंत गड येथे सकाळी ६ वाजता शिव पुतळ्याचे पूजन, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आधारित रांगोळी स्पर्धा व वेषभूषा स्पर्धा, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. बांदा – दाणोली जिल्हा मार्गावरील विलवडे शिवाजी चौक येथे सकाळी ८ वाजता विलवडे ग्रामपंचायत, सरमळे ग्रामपंचायत, भालावल ग्रामपंचायत या तिन्ही ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यापर्यंत भव्य दिव्य शिवदौडचे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता शिवपूजन, सकाळी १० वाजता शिवअभिषेक, सकाळी १०.३० वाजता शालेय मुलांचे कार्यक्रम, सकाळी ११ वाजता मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.ओटवणे श्री देव रवळनाथ वाचनालय ते श्री देव रवळनाथ विद्यामंदिर पर्यंत सकाळी ८.३० वाजता भव्य बाईक रॅली, त्यानंतर कु.ओवी अजय आरोसकर विद्यार्थिनी साहसी खेळांचे प्रदर्शन करणार आहे. यावेळी रवळनाथ विद्यामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पूर्णाकृती पुतळ्याची “प्रेरणादायी गोष्ट” व्हिडिओचे प्रेक्षपण करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख मंगेश पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता श्री रवळनाथ विद्यामंदिरच्या मैदानात शिवचरित्रावर आधारीत नवीन चित्रपट पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. सातुळी येथील स्वराज्य ग्रुपच्यावतीने सकाळी ९ वाजता भव्य मिरवणुकीनंतर महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. संध्याकाळी ४ वाजता शाळेतील मुलांचे कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे.









