खेड / राजू चव्हाण :
राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महायुती सरकार सदैव प्रयत्नशील आहे. नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गृहखाते सक्षम असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. कोकणच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही देत जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे दर मंगळवारी जनता दरबारही भरणार असल्याचेत्यांनी स्पष्ट केले.
गृहराज्यमंत्री (शहर) पदासह महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन आदी खात्यांची धुरा सांभाळणारे राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचे सोने करून एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हेच ध्येय उराशी बाळगून आपण विकासकामांचा रथ हाकणार आहोत.
- दर मंगळवारी जनता दरबार
जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासह प्रशासकीय सहाय्यासाठी दर मंगळवारी सकाळी ९ ते ११ यावेळेत मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे उपस्थित राहणार आहे. याठिकाणी जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेतली जातील. समस्या पूर्तीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना केल्या जातील. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणाचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याची खंत कदम यांनी व्यक्त केली.








