कोल्हापूर / संतोष पाटील :
नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी राबण्याची वेळ आली आहे, महायुतीत एकापेक्षा अधिक दावेदार असलेल्या जागांवर मैत्रीपूर्ण लढती करु, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना रिचार्ज करत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक संस्था निवडणुकांचे वातावरण गरम केले आहे. तुलनेत पराभूत मानसिकतेतील महाविकास आघाडीत अजूनही या पातळीवर सामसूमच आहे. सत्ताधाऱ्यांचा वज्रघात सोसण्यासाठी ‘महाविकास’च्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना सोडून ताकदीने फिल्डवर उतरावे लागणार असल्याचे संकेत भाजपच्या निवडणुकांच्या तयारीतून दिसत आहे.
राज्याप्रमाणेच कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत प्रशासकराज आहे. या काळात राजकारणानेही अनेकवेळा कुस बदलली आहे. राजकारणी आणि राजकीय पक्षांनी 360 अंशात इकडून तिकडची बाजू घेतली, तशीच मतदारांनीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मताचा कौल या पारड्यातून त्या पारड्यात टाकला. मतदारराजा, नेमका कुणाच्या बाजूने, याचा अंदाज महायुती आणि महाविकास आघाडीला अजूनही आलेला नाही. यातच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांपुढे सक्षम पर्याय खुले आहेत. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सावध भूमिका होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी संघटन दौऱ्याने ही कोंडी फुटत आहे.
कोल्हापुरात रविवारी झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनातील उत्तरेच आपल्या भाषणातून देऊन भाजपची निवडणुकीची तयारी किती खोलवर आहे, हेच एकप्रकारे दाखवून दिले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ते नेत्यांसाठी राबले, आता नेते कार्यकर्त्यांसाठी राबतील, कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, अशी त्यांना उर्मी दिली. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहेच, या जोडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे लढल्याने कार्यकर्त्यांना खूप कमी स्पेस असेल, अशी तक्रार होती. त्यावर प्रदेशाध्यक्षांनीच मैत्रीपूर्ण लढतीचा उतारा दिल्याने इकडे–तिकडे करणारे काठावरचे कार्यकर्ते पक्षासोबत बांधडल राहण्याची तजवीज केली. भाजपने सर्व शक्यतांचा विचार करुन ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्याचा निर्धार केला असल्याचे बावनकुळे यांचा दौरा द्योतक आहे.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अजून विधानसभेतील पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. केंद्रस्थ नेतृत्वाकडून कार्यक्रम आला तरच ग्राऊंंड लेव्हलला किंचित हालचाल होते. अन्यथा कार्यकर्ते आणि नेत्यांचे राजकारण घरातून म्हणजे वर्क फ्रॉमच सुरू आहे का, अशी स्थिती आहे. पुढे काय? हा प्रश्न नेत्यांसह कार्यकर्त्यांपुढे असल्याने सामाजिक प्रश्नांवर रान उठवत मतदारांपर्यंत जाणार कोण? मागील दहा–पंधरा वर्षात केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आताच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकांनी सत्ता भोगली आहे. एकमेकांवर विकासाच्या राजकारणावर बोलताना जनतेसमोर आपल्या कारकिर्दीचा हिशोब द्यावा लागणार आहे. सत्तेच्या जोरा भाजप आघाडी भविष्यातील विकासाचा अजेंडा रेटू शकते. महाविकास आघाडी कोणता अजेंडा घेऊन मैदानात उतरणार? लोकसभेला चाललेले भावनिक राजकारणाचे नाणे विधानसभेला खोटे पडले. केंद्रात, राज्यानंतर आता जिह्याच्या राजकारणाचीही दोरी हाती घेण्यास सज्ज झालेल्या भाजप युतीचे तगडे आव्हान तीन पक्षांत आणि पुन्हा पक्षांतर्गत तुकड्यात विभागलेल्या महाविकास आघाडीपुढे असणार आहे, हेच प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यातून अधोरेखित झाले.
- ‘महाविकास’चा भार सतेज पाटील यांच्या खांद्यावर
मागील निवडणुकीत काँग्रेस–राष्ट्रवादी स्वतंत्र लढले तरी अनेक प्रभागात एकमेकाला बाय दिला. आता हीच खेळी ताकदीने महायुती खेळणार असल्याने निवडणुकीत रंगत वाढणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक महत्वाची आहे. पॉलिटिकल कमबॅकसाठी ते या निवडणुकीत ताकदीने उतरतील. यापूर्वी महाविकास आघाडी ताकदवान तर होतीच आणि त्यांची सर्व सुत्रे आमदार पाटील यांच्या हाती होती. आता त्यांचे खंदे राजकीय समर्थक मंत्री हसन मुश्रीफ विरोधी गोटात आहेत. ही उणीव भरुन काढत आमदार सतेज पाटील यांना एकट्याला जोडण्या घालाव्या लागणार आहेत.








