परीक्षा केंद्रावर असणार सीसीटीव्हीची नजर
बेळगाव : एसएसएलसी परीक्षेवेळी होणारे कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने यंदाच्या परीक्षेसाठी तालुकास्तरावर वेब कास्टिंग कंट्रोल रुम उघडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे फुटेज तालुकास्तरावरील केंद्रांमध्ये दिसणार आहे. यामुळे ग्रामीण भागात होणारे कॉपीचे प्रकार रोखता येणार आहेत. दि. 21 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान दहावीची वार्षिक परीक्षा होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये एकूण 34,894 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. 97 केंद्रांवर परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शहरी भागात कॉपीचे प्रमाण वेब कॉस्टिंगमुळे कमी असले तरी ग्रामीण भागात अद्यापही कॉपी सुरू असल्याचे मागीलवर्षी दिसून आले. विशेषत: उत्तर कर्नाटकात कॉपी रोखण्यासाठी तालुकास्तरावर वेब कास्टिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेब कॉस्टिंग म्हणजे परीक्षा केंद्रांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींचे एकाच ठिकाणी फुटेज उपलब्ध करून देणे. एखाद्या परीक्षा केंद्रावर हालचाली दिसून आल्यास तेथील पेंद्र प्रमुखांना संपर्क साधून कॉपी रोखता येत आहे. मागीलवर्षी जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालय, जि. पं. कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालयात वेबकास्टिंग करण्यात आले. परीक्षा मंडळाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले असून कंट्रोल रुम स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. वेबकास्टिंगसाठी तज्ञ मंडळींची आवश्यकता असल्याने आतापासूनच तशा पद्धतीने तयारी करण्यात येत आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
विभाग विद्यार्थ्यांची संख्या केंद्र संख्या
- बेळगाव शहर 9164 19
- बेळगाव ग्रामीण 5754 20
- खानापूर 3883 11
- कित्तूर 1846 3
- रामदुर्ग 4327 14
- सौंदत्ती 5531 19
- बैलहोंगल 4389 11
- एकूण 34894 97









