2024 मधील आकडेवारी : नियम मोडणाऱ्या इतरांवरही दंडाचा बडगा
बेळगाव : मद्यप्राशन करून सुसाट वाहने चालविणाऱ्यांविरोधात प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)ने कारवाई सुरू केली आहे. मागील वर्षभरात बेळगाव आरटीओ कार्यालयाने ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात 214 जणांवर कारवाई करत सहा महिन्यांसाठी त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविण्यापूर्वी तरुणांनी विचार करणे गरजेचे आहे.
पूर्वी ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच इतर प्रकरणांमध्ये वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. परंतु, आता थेट वाहन परवानाच काही कालावधीसाठी निलंबित केला जात आहे. त्यामुळे वाहन परवान्याविना वाहन चालविणेही कठीण होते. अपघात व मद्यप्राशन करून वाहने चालविल्यानंतर सहा महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित केला जातो. तर इतर प्रकरणांमध्ये तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित केला जात आहे.
बेळगाव आरटीओ कार्यालयाने 2024 वर्षात अनेक वाहनचालकांवर कारवाई केली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात भरणे, विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वेगाने वाहने चालविणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे अशांवर कारवाई केली जाते. मागील वर्षात 1 हजार 74 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
बेळगाव विभागात 2024 मध्ये झालेली कारवाई
- अपघात 152
- डंक अँड ड्राईव्ह 214
- विनाहेल्मेट 189
- क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी 91
- ओव्हरलोड 7
- वाहन चालवताना मोबाईलचा वापर 52
- वेगाने वाहने चालविणे 286
- मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक 30
नियमानुसार वाहने चालविणे गरजेचे
प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमावलीनुसारच वाहनचालकांनी वाहने चालविणे गरजेचे आहे. अपघात, ड्रंक अँड ड्राईव्ह यासारख्या प्रकारांमुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे अशा वाहनचालकांचे सहा महिन्यांसाठी वाहन परवाने निलंबित केले जात आहेत. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
– नागेश मुंडास (प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेळगाव)









