कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थितीवर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रीज अशा ६२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबतचे संकल्पचित्र डिझाईन सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सोमवारी रात्री विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सद्या कोल्हापूर शहरात वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूकीची ही कोंडी सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपुल करण्याचा प्रस्ताव पाठवा. या उड्डाणपुलासाठीची यूटीलिटी व जागेचा खर्च महापालिका व राज्यसरकारने करावा. प्रकल्प खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करेल असे गडकरी यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस., राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सी. बी. भराडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
- केर्ली फाटा रस्त्याची उंची वाढवणार
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे महापूर येईल त्यावेळी शिवाजी पूल ते केर्ली फाटा हा रस्ता पुराच्या पाण्याखाली जातो. महापूरामुळे होणारी हानी टाळण्यासाठी या रस्त्याची उंची वाढवण्याबरोबरच सहा ठिकाणी बॉक्स तयार करण्यात येणार असून याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही गडकरी यांनी दिल्या.
- बालिंगा ते आंबेवाडी रस्त्याचा सर्वे करण्याचे आदेश
गगनबावडा कोल्हापूर हा मार्ग वर्दळीचा झाला आहे.यामुळे गगनबावड्याहून कोल्हापुरात येणारी वाहतूक कमी करण्यासाठी बालिंगा ते आंबेवाडी या रस्त्याला मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवत या रस्त्याचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले.
- कागल–सातारासाठी डिसेंबर 2025 तर कोल्हापूर रत्नागिरीसाठी मार्च 2026 पर्यंत मुदत
कागल–सातारा महामार्गाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत तर कोल्हापूर –रत्नागिरी या महामार्गाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्याना दिली.
- बास्केट ब्रीजची उंची वाढवून आराखडा तयार करा
सांगली फाटा ते उचगाव हा सव्वा चार कि.मीचा पिलर पूल व कागल शहरातील 1.2 कि.मी.च्या उड्डाणपूलाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. तसेच पिलर पुलासोबत बास्केट ब्रिजची उंची वाढवून त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
- आजरा गडहिंगलजला रिंगरोड
आजरा, गडहिंग्लज शहराभोवती रिंगरोड करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.महाडिक यांनी केलेल्या मागणीला मंत्री गडकरी यांनी सहमती दर्शवली.
- पैजारवाडी ते चौकाक सेवामार्ग
आंबा ते पैजारवाडी या सात किलोमीटच्या सेवामार्गाला नितीन गडकरी यांनी मान्यता दिली. यामध्ये पाच भुयारी मार्ग असतील. पैजारवाडी ते चौकाक हा 17 किलोमीटरचा सेवामार्ग करण्यात येणार आहे. या मार्गातही पाच भुयारी मार्ग करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शविली.








