बडोदा/ वृत्तसंस्था
2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत मंगळवारी येथे मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7-30 वाजता प्रारंभ होत आहे. गुजरात जायंट्सचे नेतृत्व गार्डनर करीत असून हरमनप्रित कौर मुंबई इंडियन्सची कर्णधार आहे. गुजरात जायंट्सच्या फलंदाजीतील त्रुटी बऱ्याच कमी झाल्याचे जाणवते. या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू गार्डनरने उपयुक्त फलंदाजी केली आहे. त्याचप्रमाणे या संघातील बेथ मुनीने अर्धशतक झळकविले आहे. गुजरात जायंट्सने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात 201 धावा जमवूनही त्यांना प्रतिस्पर्धी संघाकडून हार पत्करावी लागली होती. मात्र गुजरात संघातील वूलव्हार्ट आणि डी. हेमलता यांना मात्र पहिल्या दोन सामन्यात अधिक धावा जमविता आलेल्या नाहीत. गुजरात संघाच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने गार्डनर, प्रिया मिश्रा, डॉटीन यांच्यावर राहील.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई संघातील फलंदाज चोरट्या धावा घेण्याच्या नादात धावचीत झाले आहेत. त्यामुळे मंगळवारच्या सामन्यात मुंबईचे खेळाडू या समस्येवर निश्चितच तोडगा काढतील अशी आशा आहे. मुंबई संघाच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने मॅथ्यूज, हरमनप्रित कौर, भाटीया, नॅट सिव्हेर ब्रंट, अॅमेलिया केर यांच्यावर राहील. मुंबई इंडियन्समध्ये दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल, अमनज्योत कौर, इशाक हे प्रमुख गोलंदाज आहेत. सजीवन सजना, अमनज्योत कौर आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांना मधल्या फळीत चांगली कामगिरी करावी लागेल. गुजरात जायंट्सने आतापर्यंत या स्पर्धेत एक सामना जिंकला असून एक सामना गमविला आहे. तर मुंबई इंडियन्सने आपला सलामीचा सामना गमविला असून आता ते मंगळवारच्या सामन्यात आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करतील.
गुजरात जायंटस- बेथ मुनी, वूलव्हर्ट, डी. हेमलता, गार्डनर (कर्णधार), डॉटीन, सिमरन शेख, हर्लिन देओल, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, के. गौतम, मेघना सिंग, डी. गिब्सन, लिचफिल्ड, पी. कश्यप, शबनम शकील, पी. नाईक आणि भारती फुलमाली.
मुंबई इंडियन्स – हरमनप्रित कौर (कर्णधार), मॅथ्यूज, भाटीया, नॅट सिव्हेर ब्रंट, अॅमेलिया केर, सजीवन सजना, अमनज्योत कौर, जे. कलिता, संस्कृती गुप्ता, शबनम इस्माईल, सायका इशाक, कीर्तना बालकृष्णन, क्लो ट्रायॉन, पी. सिसोदिया, अमनदीप कौर, कमलिनी, अक्षिता माहेश्वरी, नदिने डी. क्लार्क.









