विरोधी पक्षनेत्यावरही कारवाई
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी गदारोळ झाला असून विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी समवेत भाजपच्या 4 आमदारांना तीस दिवसांसाठी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अन्य आमदारांमध्ये अग्निमित्रा पॉल, बंकीम घोष आणि विश्वनाथ कारक यांचा समावेश आहे. सरस्वती पूजेशी संबंधित घडलेल्या अलिकडच्या घटनांवरून भाजपने विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता, सभापती विमान बॅनर्जी यांनी प्रस्ताव वाचनाची अनुमती दिली. अग्निमित्रा पॉल यांनी या प्रस्तावाचे वाचन केले, परंतु विधानसभा अध्यक्षांनी यावर चर्चा करविण्यास नकार दिला. या निर्णयाने नाराज भाजप आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली आणि अधिकारी यांच्या नेतृत्वात विधानसभेत जोरदार निदर्शने केली.
30 दिवसांसाठी निलंबन
शुभेंदु अधिकारी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनानजीक जात कागद फाडून भिरकाविल्याचा आरोप आहे. अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी भाजप आमदारांच्या वर्तनाची कठोर निंदा केली. यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्यासोबत चार भाजप आमदारांना 30 दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
हिंदूंबद्दल बोलल्याने कारवाई : अधिकारी
हिंदूंच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित केल्यानेच माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानसभेतील संबोधनापूर्वी मला आणि अन्य भाजप आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण जेव्हा थेट प्रसारित केले जाईल, तेव्हा देखील विधानसभेबाहेर मी व्यक्त होणार आहे. तर मुख्यमंत्री सभागृहात दाखल झाल्यावर भाजप कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले आहे.









