कायद्याचा धाक गायब : क्षुल्लक कारणावरून मुडदे पाडण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल, पोलीस खात्याच्या नरमाईमुळे गुंडगिरी फोफावली
बेळगाव : नववर्षाच्या सुरुवातीलाच बेळगावात गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. मटका व जुगारी अड्ड्यांना खुली सूट देऊन केवळ वरकमाईत गुंतलेल्या काही अधिकाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला सुरुंग लागत आहे. चोऱ्या, घरफोड्या, खून, चाकू हल्ले, अमली पदार्थांची विक्री व सेवन आदी घटनांमुळे बेळगावकरांची चिंता वाढत चालली आहे. शनिवारी क्षुल्लक कारणावरून फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार लवू मामलेदार (वय 67) यांचा खून झाला. या घटनेने तर बेळगावकर चक्रावून गेले आहेत.
एखाद्या शहराची कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवायची असेल, त्या शहरातील पोलीस यंत्रणा सक्षम असावी लागते. पोलीस यंत्रणा जर ढिली पडली तर पोलीस दलाविषयी जनमानसात असलेली भीती व त्यांच्याबद्दलचा आदर कमी होत जातो. त्यामुळे साहजीकच सराईत गुन्हेगार तर सोकावतातच. काही अतिउत्साही व आततायी तरुणही गुन्हे करण्यासाठी घाबरत नाहीत. शनिवारी याचाच परिणाम पहायला मिळत आहे. केवळ ऑटोला कार घासून गेली म्हणून ऑटोचालकाने वयाचाही विचार न करता लवू मामलेदार यांच्यावर हल्ला केला आहे.
खडेबाजार येथील श्रीनिवास लॉजसमोर झालेल्या या घटनेनंतर थोड्या वेळातच लवू मामलेदार यांचा मृत्यू झाला आहे. यासंबंधी सुभाषनगर येथील अमिरसोहेल सनदी (वय 27) या तरुणावर एफआयआर दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. किरकोळ व क्षुल्लक घटनेनंतर वयाचाही विचार न करता एखाद्या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करण्यापर्यंत मजल कशी जाते? ऑटोचालकांना पोलीस प्रशासनाची भीती नाही का? कार ऑटोला घासून गेली असेल तर पोलिसात तक्रार करण्याऐवजी स्वत:च कायदा हातात घेण्यापर्यंत मन:स्थिती कशी तयार झाली? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
तसेच ऑटोरिक्षांना मीटर बसवावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीही सुरुवातीला बैठका घेऊन मीटरसक्तीची घोषणा केली होती. मीटरसक्तीची अंमलबजावणी तर झाली नाही. उलट काही जणांची मनमानी कमी झाली नाही. पोलीस यंत्रणेकडून सातत्याने तपासणी तसेच कारवाईचा सपाटा सुरू राहिला तर कायदा पाळण्याची मन:स्थिती तयार होते. हे प्रयत्न तोकडे पडले तर व्यवस्थेची भीतीच रहात नाही. सध्या बेळगावात अशीच परिस्थिती पहायला मिळते.
गुन्हेगारीचा आलेख वाढताच
केवळ दोन महिन्यांतील घटना लक्षात घेता गुन्हेगारीचा आलेख कसा वाढत चालला आहे, हे दिसून येते. काकती व माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावात कर्जाच्या नावाने हजारो जणांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. पिरनवाडी, ताशिलदार गल्ली, गणाचारी गल्ली, खादरवाडी, सरस्वतीनगरसह शहर व उपनगरातील अनेक ठिकाणी चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंगच्या घटना सुरूच आहेत.
नववर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस रेकॉर्डवरील प्रफुल्ल पाटील (वय 30) रा. शाहूनगर यांच्यावर हिंदूनगर-गणेशपूरजवळ गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचे काय झाले, ते कोठे आहेत? पोलीस त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? या प्रश्नांची उत्तरेही शोधावी लागणार आहेत. चन्नम्मानगर येथे तर एका महिलेच्या डोळ्यात तिखट टाकून तिच्या गळ्यातील 62 ग्रॅमचे दागिने पळविण्यात आले. रयत गल्ली, वडगाव येथे जावयाने सासूचा खून केल्याची घटना घडली. रामतीर्थनगर येथे पत्नीकडून पतीचा खून झाला. हिंडलगा, रामनगर परिसरात चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
अधिकाऱ्यांमधील गटबाजीही कारणीभूत
गुन्हेगारी घटनांमध्ये सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेतला जातो. चोऱ्या, घरफोड्यांत गुंतलेले बहुतेक गुन्हेगार गांजा, पन्नीच्या नशेत गुन्हे करू लागले आहेत. कार, मोटारसायकली चोरीचे प्रकार सुरूच आहेत. बेळगाव येथील वाढत्या गुन्हेगारीला पोलीस दलाच्या ढिलाईबरोबरच अधिकाऱ्यांमधील गटबाजीही कारणीभूत असल्याचे दिसून येते. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांना सुरुवातीला या गटबाजीची कल्पना आली नव्हती. बेळगावात फोफावलेल्या मटका, जुगाराविषयी व या गैरधंद्यांतूनच फोफावत चाललेल्या गुन्हेगारीविषयी त्यांना अंधारात ठेवण्यात आले होते.
काही अधिकाऱ्यांमुळेच गुन्हेगारीत वाढ…
गेल्या पंधरवड्यापूर्वी पोलीस आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना मटका,जुगार थोपविण्याची सक्त सूचना केल्यानंतर मटका व जुगारी अड्डेचालकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव गैरधंदे बंद पाडावे लागत आहेत. पोलीस आयुक्तांनी ताकीद केल्यानंतर थोडे दिवस सगळे बंद करा, असा संदेश गैरधंदेचालकांना देण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांच्या भोवती एक विषवर्तुळ तयार झाले असून त्यांची दिशाभूल करीत गैरधंदे चालकांना पाठीशी घालणाऱ्या काही अधिकाऱ्यांमुळेच बेळगावात गुन्हेगारी फोफावत चालली आहे.









