ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात
कोल्हापूर जिल्ह्यात १.१० कोटी, सांगली जिल्ह्यात ७१.७० लाख टन गाळप पूर्ण
कोल्हापूरः धीरज बरगे
कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी, खासगी अशा एकूण 23 साखर कारखान्यांच्या माध्यमातून 15 फेब्रुवारी अखेरपर्यत सुमारे 1 कोटी 10 लाख 28 हजार 800 टन ऊसाचे गाळप झाले आहे. तर सांगली जिल्ह्यात सुमार 71.70 लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले. कोल्हापूर विभागात एकूण सुमारे 1 कोटी 81 लाख 98 हजार 800 टन इतके गाळप झाले आहे. साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून विभागात अद्यापही 97 लाख टन ऊस शिल्लक आहे. साखर उतारा सरासरी 10.25 टक्के इतका आहे.
जिल्ह्यातील गळीत हंगाम यंदाही उशिरा सुरु झाला. गतहंगामात ऊसला दूसरा हप्ता देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन केले. यामुळे सन 2023-24 हंगाम उशिरा सुरु झाला. तर 2024-25 च्या हंगामाच्या सुरवातीसच विधानसभा निवडणुका लागल्या होत्या. बहुतांश साखर कारखान्यांचे चेअरमन विधानसभा निवडणुक लढवत असल्याने हंगामाची सुरुवात संथ गतीने झाली. यामुळे कोल्हापूरातील ऊसतोड मजूर कर्नाटकात गेले. त्यामुळे हंगामात ऊसतोड मजूरांची टंचाई भासेल अशी परिस्थिती होती. मात्र ऊस तोडणी मशिन आणि मजूरांची उपलब्धता झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील गळीत हंगामाने गती घेतली.
गाळपात जवाहर हुपरी आघाडीवर
ऊस गाळपात हुपरीचा कल्लापाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. 15 फेब्रुवारीअखेर कारखान्याने सुमारे 12 लाख 59 हजार 625 इतका ऊस गाळप केला आहे. तर त्या पाठोपाठ वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याने सुमारे 10 लाख 22 हजार 367 टन इतक्या ऊसाचे गाळप केले आहे.
जिल्ह्यात दिवसाकाठी 1.32 लाख टन गाळप
जिल्ह्यातील एकूण 23 साखर कारखान्यांची ऊस गाळप क्षमता पाहता दिवसाकाठी 1 लाख 32 हजार 960 टन इतक्या ऊसाचे गाळप होते. हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याची सर्वाधिक 16 हजार मे.टन इतकी गाळप क्षमता आहे. तर त्या खालोखाल शिरोळचा दत्ता आणि वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे साखर कारखाना यांच्याकडून प्रत्येकी 12 हजार मे.टन इतका ऊस गाळप केला जातो.
कोल्हापूर विभागात 15.56 लाख मे.टन साखर उत्पादन
कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एकूण 39 साखर कारखान्यांच्या माध्यमातून 31 जानेवारी अखेर 15 लाख 56 हजार 535 मे.टन इतके साखरेचे उत्पादन झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 9 लाख 90 हजार 410 मे.टन तर सांगली जिल्ह्यात 5 लाख 75 हजार 503 मे.टन साखर उत्पादन झाले आहे.
सांगली जिल्ह्यात सुमारे 71 लाख टन गाळप
सांगली जिल्ह्यात सहकारी, खासगी अशा एकूण 17 साखर कारखान्यांकडून सुमारे 71.70 लाख इतका ऊस गाळप केला आहे. येथील सर्व साखर कारखान्यांच्या माध्यमातून दिवसाकाठी सुमारे 83 हजार 551 टन ऊसाचे गाळप केले जाते.
जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडून झालेल्या ऊस गाळपाची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
सहकारी साखर कारखाने
कारखान्याचे नाव ऊस गाळप (लाख मे.टनमध्ये)
आजरा 259506
भोगावती 326282
छ.राजाराम, क.बावडा 279216
छ. शाहू, कागल 604425
श्री दत्त, शिरोळ 899942
दूधगंगा, वेदगंगा बिद्री 605421
जवाहर हुपरी 1259625
मंडलिक, हमिदवाडा 285202
कुंभी-कासारी, कुडीत्रे 301830
पंचगंगा, इचलकरंजी 497615
शरद, नरंदे 292510
तात्यासाहेब कोरे, वारणानगर 1022367
अथणी शुगर, सोनवडे-बांबवडे 474371
डॉ. डी. वाय. पाटील, गगनबावडा 445730
अथर्व, हलकर्णी, चंदगड 343497
अप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज 185593
खाजगी साखर कारखाने :
कारखान्याचे नाव ऊस गाळप (लाख मे.टनमध्ये)
दालमिया, आसुर्ले-पोर्ले 779417
गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी 418806
इको-केन म्हाळुंगे, चंदगड 320775
ओलम राजगोळी, चंदगड 441571
संताजी घोरपडे, कागल 476091
ओंकार शुगर फराळे, राधानगरी 185046
अथणी शुगर, भुदरगड 334684








