रविवारी पाचव्या दिवशी देवीची गदगेवर स्थापना : तरुणांबरोबरच महिलांनी घेतला नृत्याचा आनंद
वार्ताहर/नंदगड
येथील लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त शनिवार व रविवार दोन दिवस देवीचा रथोत्सव उत्साहात पार पडला. रविवारी तब्बल पाच तास रथोत्सव झाला. सायंकाळी सव्वा सहा वाजता देवीची गदगेवर स्थापना करण्यात आली. रथोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. लक्ष्मीदेवी यात्रेत शनिवारी सायंकाळी व रविवारी दुपारपासून रथोत्सव पार पडला. रविवारी पाचव्या दिवशी देवीची गदगेवर स्थापना करण्यात आली. येथील कामाण्णा खुटपासून रथोत्सवाला सुऊवात झाली. कॉलेज रोडवरून नारायण मंदिरपर्यंत देवीची तब्बल पाच तास मिरवणूक काढण्यात आली. रथोत्सवनिमित्त ग्रामस्थांनी भगवे फेटे व भगवा पोशाख परिधान केला होता. काहींनी डोक्यावर टोपी तर काहींनी भगवा फेटा बांधला होता. सर्वत्र भंडाऱ्याची उधळण केली जात होती. रथाच्या अग्रभागी शौर्य ढोल ताशा पथक झाडनावगा, ढोल पथक बेनकट्टी, श्रीराम चेन्नई पथक उडुपी, तानाजी साठे हलगी ग्रुप कोल्हापूर आदी वाद्य पथके सहभागी झाली होती. शिवाय डीजे लावण्यात आला होता.
वाद्यांच्या गजरात व डीजेच्या तालात अनेकांनी नृत्याचा ठेका धरला होता. त्यामुळे सर्वत्र एकच उत्साह दिसत होता. नृत्यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. रथावर विद्युत दिव्यांची आरास करून रथावर भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. रथ नारायण मंदिराजवळ येताच देवीची मूर्ती रथातून खाली उतरविण्यात आली. त्यानंतर तेथे जवळपास अर्धा तास हातावरून खेळविण्यात आली. त्यानंतर यात्रा स्थळी गदगा परिसरात देवीची मूर्ती नेण्यात आली. सुऊवातीला गदगेसभोवती पाच फेरे काढण्यात आले. त्यानंतर देवीची मूर्ती गदगेवर स्थानापन्न करण्यात आली. दरम्यान, अन्य धार्मिक विधी पार पडले. गदगेवर राम मंदिराची प्रतिकृती असलेले मंदिर बनविण्यात आले आहे.
विद्युत रोषणाईने हे मंदिर सजविण्यात आले आहे. या भागात प्रथमच अशी प्रतिकृती करण्यात आल्याने ते मंदिर सर्वांचे आकर्षण बनले आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर रात्री नऊ वाजल्यापासून भक्तांसाठी देवीचे दर्शन खुले करण्यात आले आहे. रविवारी रथोत्सव, देवीची गदगेवर स्थापना व घरोघरी जेवणावळीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याने सायंकाळपासून मित्रपरिवार, पै-पाहुणे व जनतेने मोठी गर्दी केली होती. गावच्या तिन्ही वेशींतून वाहने जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे देवीचे दर्शन व आपल्या मित्र परिवारांच्या व पाहुण्यांच्या घरी पोहोचण्यास सर्वांना सोयीचे झाले.
नंदगड लक्ष्मी यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम
नंदगड लक्ष्मी यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच रोज रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.सुरूवातीला बुधवार दि.12 पासून तीन दिवस रात्री भजनाचे कार्यक्रम पार पडले. शनिवार दि. 15 रोजी रात्री मराठी नाटक दर्डा सिंग दरोडा हा विरक्त मठा समोर झाला. सोमवार दि. 17 रोजी कन्नड नाटक रयतर नखरे जगत वेल्ला सकरे होणार आहे.मंगळवार दि. 18 रोजी रात्री 9 वाजता रीया पाटील आणि तुकाराम महेंद्रकर ग्रुप प्रस्तुत वेड घुंगराचा संस्कृती कार्यक्रम, बुधवार दि.19 रोजी भजन,गुऊवार दि .20 रोजी रात्री 9 वाजता कन्नड नाटक हळ्ळी हुडगी मसरू गडगी, शुक्रवार दि. 21 रोजी रात्री 9 वाजता मराठी नाटक मृत्युंजय छत्रपती संभाजी. शनिवार दि. 22 रोजी रात्री 9 वाजता धमाका आर्केस्ट्रा कोल्हापुर आदी कार्यक्रम होणार आहेत. नंदगड ग्रामस्थां सह पै पाहूणे व भावीकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी यात्रा सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष शंकर सोनोळी यांनी केले आहे.









