65 दिवसात तब्बल 74 सामने : केकेआर-आरसीबीत रंगणार सलामीचा सामना : ईडन गार्डन्सवर फायनल
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल 2025 चे वेळापत्रक रविवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च रोजी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) यांच्यातील सामन्याने सुरू होईल. दरम्यान, 65 दिवसांत 74 सामने खेळवले जातील. 18 मे पर्यंत 70 लीग स्टेज सामने होतील, ज्यात 12 डबल हेडरचा समावेश असेल. म्हणजे 12 वेळा एका दिवशी 2 सामने खेळले जातील. अंतिम सामना 25 मे रोजी कोलकाता येथे होईल.
आयपीएलमध्ये स्पर्धेचे उद्घाटन आणि अंतिम सामने गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातात. यावेळीही हे दोन्ही सामने कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहेत. 23 मार्च रोजी पहिला सामना एसआरएच आणि आरआर यांच्यात खेळला जाईल. यानंतर, दुसरा सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. या हंगामात लीग टप्प्यात सीएसके आणि चेन्नई दोनदा आमनेसामने येतील. त्याच वेळी, 7 एप्रिल रोजी आरसीबी आणि मुंबई यांच्यात फक्त एकच लीग सामना खेळला जाईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
स्पर्धेत एकूण 74 सामने खेळवले जाणार
यंदाच्या आयपीएलचा 18 वा हंगामात देशातील 13 शहरात आयोजित केला जाणार आहे. लखनौ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाळा येथे खेळवले जातील. आयपीएल 2025 मध्ये 65 दिवसांत एकूण 74 सामने खेळवले जातील. लीग सामने 22 मार्च ते 18 मे दरम्यान खेळवले जातील. यानंतर 20, 21, 23 आणि 25 मे रोजी प्लेऑफ सामने आयोजित केले जातील. दरम्यान, आयपीएल 2024 प्रमाणेच यंदाच्या स्पर्धेचे स्वरुप असणार आहे. त्यानुसार 10 संघांची दोन गटात विभागणी केली आहे. प्रत्येक संघ लीग टप्प्यात 14 सामने खेळेल. या दोन महिन्यांच्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे 10 आयपीएल संघ विजेतेपद जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.









