स्थानिक निवडणुकांवरून अंतर्गत कलह
वृत्तसंस्था/ चंदीगड
अंबाला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तिकीटवाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह दिसून येत आहे. अंबाला कँटचे आमदार अन् भाजपचे वरिष्ठ मंत्री अनिल विज हे स्वत:च्या 15 समर्थकांना उमेदवारी न मिळाल्याने भडकले आहेत. स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे नाकारत पक्षनेतृत्व स्तरावरूनच सर्वकाही निश्चित होत असेल तर आमची गरजच काय असे प्रश्नार्थक विधान विज यांनी केले आहे. माझे म्हणणे कुणीच ऐकून घेत नसेल तर मी विदेशात जाऊ का अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याचदरम्यान अनिल विज यांची त्यांचे समर्थक भेट घेत आहेत. तर दुसरीकडे अंबाला भाजपकडून पक्षनेतृत्वाला एक ईमेल पाठविण्यात आला असून यात उमेदवारी वाटपावरून असलेली नाराजी नमूद करण्यात आली आहे. अनिल विज जो निर्णय घेतील ते स्वीकारू असे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.
पक्षनेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास विजय हे मंत्रिपदाचा राजीनामा देतील असे मानले जात आहे. माझे विधानसभा सदस्यत्व कुणीच काढून घेऊ शकत नाही. मंत्री म्हणून मिळणारा बंगला मी स्वीकारलेला नाही आणि कार देखील परत करण्यास तयार असल्याचे विज यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.









