वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीमुळे भयभीत अफगाणी लोक अमेरिकेत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु अफगाणी लोक पाकिस्तानात अडकून पडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशामुळे या लोकांसमोर संकटच ओढवले आहे. या आदेशाच्या अंतर्गत पुढील 90 दिवसांपर्यंत कुठल्याही देशातून शरणार्थी अमेरिकेत येऊ शकणार नाही. बिडेन प्रशासनाने अमेरिकेत येण्याची अनुमती दिलेले 15 हजारांहून अधिक अफगाण शरणार्थी पाकिस्तानात आहेत.
अमेरिकेने 2021 मध्ये अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्यापूर्वी हजारो शरणार्थींना देशात आश्रय देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ट्रम्प यांच्या आदेशामुळे या शरणार्थींचे भवितव्य संकटात सापडले आहेत. अफगाणिस्तानात परतलो तर तालिबानी राजवट जिवंत सोडणार नसल्याची भीती त्यांना सतावत आहे.
पाकिस्तानचा आदेश
अफगाणिस्तानचे लोक सध्या इस्लामाबाद-रावळपिंडीमध्ये रस्यांच्या कडेला राहत आहेत. ट्रम्प यांनी निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्हाला संकटाला सामोरे जावे लागेल असे या लोकांचे म्हणणे आहे. याचदरम्यान पाकिस्तान सरकारने या अफगाण शरणार्थींना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. तिसऱ्या देशात स्थानांतरित न होऊ शकणाऱ्या अफगाण शरणार्थींना 31 मार्चनंतर पाकिस्तान सोडावे लागेल असे सरकारने बजावले आहे.
पाकिस्तानात शरणार्थी संकट
तालिबान सत्तेवर आल्यावर लाखो अफगाण नागरिकांनी शेजारी देशांमध्ये धाव घेतली, यातील सर्वाधिक लोक पाकिस्तान अन् इराणमध्ये पोहोचले. पाकिस्तानात यापूर्वीच सुमारे 30 लाख अफगाण शरणार्थी असून यातील बहुतांश जण 1980 च्या दशकात सोव्हियत आक्रमणाच्या दरम्यान आले होते. तर तालिबानची पुन्हा राजवट आल्यावर 6 लाखाहून अधिक नवे शरणार्थी पाकिस्तानात पोहोचले. 203 च्या अखेरपर्यंत पाकिस्तान सरकारने अवैध अफगाण शरणार्थींना परत पाठविण्याची मोहीम सुरु केली होती. पाकिस्तानने 15 लाखाहून अधिक अवैध शरणार्थींना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. तालिबानने पाकिस्तानच्या या कारवाईवर आक्षेप दर्शविला आहे.









