आता याचे लाभ लोकांना सांगतोय
पर्सनल हायजीनचा मुद्दा असल्यास सर्वप्रथम स्नानाचा विचार येतो, परंतु एका अमेरिकन डॉक्टरने या धारणेला पूर्णपणे आव्हान दिले आहे. अमरिकेच्या प्रिवेंटिव्ह मेडिसीन डॉक्टर जेम्स हॅमब्लिन यांनी आपण मागील 5 वर्षांपासून स्नान केलेले नाही आणि तरीही माझ्या शरीरातून दुर्गंध येत नसल्याचा दावा केला. शॅम्पू, साबण आणि उर्वरित स्कीन प्रॉडक्ट्स शरीरासाठी उपयुक्त नव्हे तर नुकसानदायी असल्याचेही त्याने म्हटले आहे.
डॉ. हॅमब्लिन हे एक पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आणि लेखक देखील आहेत. स्नानाची सवय आरोग्यासाठी आवश्यक आहे का केवळ एक वैयक्तिक पर्याय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी 5 वर्षांपर्यंत शॉवर घेतलेला नाही. स्वत:च्या शरीराला नैसर्गिक पद्धतीने संतुलित होऊ दिले. स्वत:ला नैसर्गिक स्वरुपात साफ करू शकेल अशी क्षमता शरीरात असते. प्रारंभी काही दुर्गंध आला, परंतु काही आठवड्यांमध्ये शरीराने स्वत:ला अॅडजस्ट करून घेतल्याचे हॅमब्लिन यांनी सांगितले.
आमच्या त्वचेवर मायक्रोबायोम म्हणजेच बॅक्टेरियाची नॅचरल इकोसिस्टीम असते. वारंवार साबण आणि शॅम्पूचा वापर केल्याने त्वचेची नॅचरल ऑइल्स आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे वारंवार त्वचेला मॉइस्चराइजर आणि अन्य गोष्टींची गरज भासते, याचा प्रभाव त्वचेवरही दिसून येतो. आम्ही कुठल्याही कारणाशिवाय स्वत:ला साफ करण्याच्या नादात स्वत:च्या त्वचेचे नैसर्गिक संतुलन बिघडवत आहोत असे डॉ. हॅमब्लिन यांनी सांगितले आहे.
दुर्गंध का आला नाही?
स्नान न केल्यास दुर्गंध येईल असा विचार लोक करतात, परंतु काही आठवड्यांपर्यंत असे घडते, हळूहळू शरीर स्वत:ला संतुलित करून घेते आणि दुर्गंध दूर होतो. मी लोकांना स्नान करण्यास मनाई करत नाही, तर जर कुणाला स्नान करणे चांगले वाटत असेल तर हे ठीक आहे. परंतु जर कुणी अधिक शॉवर घेत नसेल तरीही कुठलीच अडचण नाही. जर तुमच्या त्वचेचा थर दिसून येत असेल तर केवळ पाण्याने साफ करणे पुरेसे आहे. दरवेळी साबण्याचा वापर आवश्यक नाही असे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर यासंबंधी उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक या डॉक्टरच्या दाव्याशी सहमत दिसून आले.तर काहींनी याला थट्टेच्या स्वरुपात घेतले आहे. एका युजरने जर मी पाच दिवस स्नान केले नाही तर कुटुंबीय घरातूनच हाकलून देतील, पाच वर्षे तर दूरच राहिली अशी मजेशीर टिप्पणी केली आहे.









