रत्नागिरी :
शिवसेनेत गेलात तर डोकी फुटतील, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. परंतु डोके फोडणारे आता त्यांच्याकडे आहेत का? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. माझ्या नादाला लागू नका. माझी रेषा पुसण्याचा प्रयत्न करू नका. दाढी काय आहे, हे मी अडीच वर्षांपूर्वी तुम्हाला दाखवून दिले आहे. आता तर विरोधकांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार असल्याचा इशारा शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
येथील चंपक मैदानावर शनिवारी शिवसेनेच्या वतीने आयोचित आभार यात्रेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते रामदास कदम, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महसूल–गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणे, आमदार किरण सामंत, रवींद्र फाटक, माजी आमदार राजन साळवी, राजेंद्र महाडिक, विलास चाळके, बंड्या साळवी, जयसिंग घोसाळे, राजन शेट्यो, बिपीन बंदरकर, रचना महाडीक, शिल्पा सुर्वे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
- जनतेच्या न्यायालयात आम्हालाच कौल
शिवसेनेला कोकणी जनतेने कायम प्राणवायू दिला आहे. त्याचा पुरवठा आजही कायम आहे. पक्षवाढीसाठी फेसबुक नव्हे तर फेस टू फेस जावे लागते. आपण सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही. गरीब घरात जन्म घेऊन शिवसेना वाढीसाठी आयुष्य वेचले. ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण गहाण ठेवला तोच धनुष्य आपण बंधनमुक्त केला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता व आजही आहे. यापुढे हा बालेकिल्ला कायम अभेद्य राहणार. विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. विधानसभेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट 95 टक्के राहिला. कोकणातील 15 पैकी 14 जागांवर महायुतीचे आमदार विजयी झाले. राज्यात 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा शब्द आपण दिला होता. तो पूर्ण करत 232 आमदार विजयी केले. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात बाळासाहेबांचे खरे वारसदार आपणच असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याबद्दल आपण जनतेचे ऋणी आहोत. आपल्याला आता शिवसेना अधिक भक्कम करायाची आहे. यासाठी येथील गावातील वाड्यावाड्यांतून पोहोचून येथील जनतेच्या मनापर्यंत पोहोचा, असे आवाहन शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
- लाडक्या भावाचे पद कोणीही हिरावून घेऊच शकत नाही
मागील अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आपण बंद पडलेली विकासकामे, प्रकल्प, पाणी योजना सुरू केल्या. सर्वसामान्य जनतेला जे पाहिजे आहे, ते देण्याचे काम सत्ताधारी म्हणून आपले आहे. पदे येतात जातात, सत्ता येते जाते. परंतु आपण राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ बनलो, हे सर्वात मोठे पद आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे शिंदे म्हणाले.
- लाडक्या बहिणी–भावांचे मानले आभार
शिंदे यांनी आपल्या मनोगताच्या प्रारंभालाच हजारोंच्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणी, भावांचे जाहीरपणे आभार मानले. विधानसभेतील विजय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण आल्याचे त्यांनी सांगितले. कोकणी जनतेने बाळासाहेबांवर खूप प्रेम केले. तेवढ्याच ताकदीने बाळासाहेबांनीही कोकणी जनतेवर प्रेम केले होते. कोकणी जनतेचे हे प्रेम आजही खऱ्या शिवसेनेसोबत आहे. विधानसभेतील विजयात कोकणाचा सिंहाचा वाटा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
- नादाला न लागण्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेवर जोरदार प्रहार केला. उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे यांना झोपेतसुद्धा एकनाथ शिंदेच दिसतात. सध्या उठसूठ आरोप करणे, हा त्यांचा एकमेव धंदा त्यांचा सध्या सुरू आहे. परंतु आपण आरोपांना विकासकामातून उत्तर देत असतो. कोकणातील कोयना अवजल समुद्राला जाऊन मिळते. त्याचा वापर कोकणासाठी व्हावा याकरीता आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रकल्पाची निर्मिती केली. त्याचे काम आता सुरू झाले आहे. कोयनेतील 67 दशलक्ष घनमीटर पाणी आता अडवले जाणार आहे. मागील अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर गेला. आताही काही हजार कोटींचे करार करून उद्योग उभारणीसाठी प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील वाटद, झाडगाव येथे 30 हजार कोटींचे प्रकल्प उभे राहत आहेत. मुंबई–गोवा जोडणाऱ्या एक्स्प्रेस हायवेची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. कोकणाला कॅलिफोर्नियासारखे नाही तर कॅलिफोर्नियाला कोकणासारखे व्हावे असे वाटेल, अशाप्रकारे आपल्याला येथे विकास घडवायचा आहे. यासाठी विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
- माजी आमदार सुभाष बनेंसह अनेक जणांचा प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आभार मेळाव्यात ठाकरे सेनेतील पदाधिकाऱ्यांचा मोठा पक्षप्रवेश झाला. यामध्ये माजी आमदार सुभाष बने, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, उबाठा जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जि. प. माजी अध्यक्ष रचना महाडिक, जि. प. माजी अध्यक्ष जगदीश राजापकर, जयसिंग खोत, प्रशांत सुर्वे, अशोक सावंत (कोकण संघटना सांगली), दिलीप सावंत, संतोष लाड, सारिका जाधव, सोनाली निकम, वैभव पवार, संदीप सावंत, बाबा दामुष्टे, अशोक तांबे, संतोष चव्हाण, उर्मिला चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.








