मिरज :
येथील मिरज-कोल्हापूर रस्त्यावर रजपूत गार्डनजवळ गांजा विक्रीसाठी थांबलेल्या तरुणास पकडून ५७हजारांचा दोन किलो, तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा गांधी चौकी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी धनंजय बळवंत भोसले (वय ३३, रा. साई मंदिर एमआयडीसी रस्ता, मिरज) याला अटक केली आहे. दुसरा संशयीत सुरज नागनाथ सरवदे (रा. रविवार पेठ, जोशी गल्ली सोलापूर) हा फरार झाला आहे. कोल्हापूर रस्त्यावर एक तरुण गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित धनंजय भोसले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गांजा हस्तगत केला. सदरचा गांजा हा सुरज सरवदे याच्याकडून मागवून किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले महात्मा गांधी चौक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार संशयीताचा शोध घेतला जात आहे.








