सातारा :
सातारा शहरात चाँदणी चौकापासून ते मारवाडी आळीपर्यंत फुटपाथ असूनही त्यावरुन सातारकरांना चालता येत नव्हते. फुटपाथवर भाजी विक्रेत्यांच्या दुकानांसह इतर दुकाने थाटलेली असायची, आम्हाला फुटपाथ मोकळे करुन द्या अशी विनंती वजा तक्रार सातारा पालिकेकडे ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीनुसार सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने शनिवारी फुटपाथ रिकामे केले आहे. मात्र, हे रिकामे करताना त्या पथकावर काही माजी नगरसेवकांचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पालिकेने केलेल्या कार्यवाहीमध्ये सातत्य राहणार काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
चाँदणी चौक ते तांदूळआळी या छोट्याशा अरुंद रस्त्यावरही अलिकडे भाजी विक्रेते दुकाने मांडून बसलेले असतात. तेथे नगरवाचनालय आहे. पुढे दारुचे दुकान आहे. त्यामुळे वादाचा नेहमीचा प्रकार घडत असतो. त्याचबरोबर राजपथावर अगदी गोलबागेच्या समोरच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ ते मारवाडी गल्लीपर्यंत रस्त्यावर चावीवाला, लिंबूमिरच्या विक्री करणारे, फळवाले, कपडे विक्री करणारे, चप्पल विक्री करणारे असे फुटपाथवरच्या विक्रेत्यांनी फुटपाथवरच भाजी मंडई भरवली होती. त्यामुळे सायंकाळचे तर रस्त्याने चालता येत नसल्याने फुटपाथवरुन चालावे तर त्यावर दुकाने लावलेली असतात. त्याची तक्रार साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक संघटनेने पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे करुन फुटपाथ मोकळा करुन देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दुकानदारांना सूचना देवून फुटपाथ रिकामा केला आहे. मात्र, काही माजी नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवत आमचेच मतदार आहेत. नका करु कारवाई, असू द्या त्यांना तिथेच बसू द्या, अशी दमबाजी केल्याचे समजते. त्यामुळे पालिकेने केलेले कार्यवाहीला किती यश येते हे पहावे लागणार आहे.
- साताऱ्यातील सर्व फुटपाथ रिकामेच हवे आहे
याबाबत ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून या कार्यवाहीबाबत पालिकेचे कौतुक केले असून फुटपाथ हे रिकामेच पाहिजे आहे. पालिकेने विक्रेत्यांना अन्य ठिकाणी म्हणजे जेथे गाळे बांधले आहेत. तेथे बसण्याची सक्ती करावी, अशीही मागणी केली जात आहे.








