बेळगावमधील ऑटो रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रयत्नांची होतेय शर्थ
प्रतिनिधी/ बेळगाव
घराबाहेर गेलेला आपला माणूस सुरक्षितपणे, सुखरूपपणे पुन्हा घरी येईल, याची शाश्वती आज कोणालाच राहिली नाही. इतका आपला भवताल बदलला आहे. गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्याबाबत नेमके हेच म्हणावे लागेल. ते बेळगावला येतात काय, त्यांचे वाहन ऑटोला घासून जाते काय, त्यांच्यावर हल्ला होतो काय आणि त्यांचा शेवट मृत्यूमध्ये होतो काय…सारेच अनाकलनीय, तितकेच गंभीर आणि आजच्या दाहक वास्तवाची जाणीव करून देणारे.
एखादा गुन्हा घडला तर त्यासाठी कायदा, न्यायालय आहेतच. परंतु, कायदा हातात घेण्याचा प्रकार वाढत चालला आहे. तर दुसरीकडे बेळगावमधील ऑटो व रिक्षाचालकांची मनमानी हा आता गंभीर आणि कळीचा मुद्दा बनला आहे. ते ना मीटर लावणार, ना वाहन वेगावर नियंत्रण ठेवणार, त्यांचे स्वत:चेच काही नियम ठरले आहेत. ते म्हणजे एका रिक्षात (वडाप) अनेकांना कोंबणार, समोर दोघांना बसवून घेणार, वेड्यावाकड्या पद्धतीने ऑटो चालवणार, पुन्हा कानाला मोबाईल लावणार, याबद्दल त्यांना हटकताच सरळ रिक्षा किंवा ऑटोतून उतरण्याचा आदेशच येतो.
बेळगावमधील ऑटो- रिक्षाचालकांना शिस्त लावावी, यासाठी आजपर्यंत आलेल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने प्रयत्नांची शर्थ केली. परंतु, ते सर्व व्यर्थ झाले आहे. सरसकट रिक्षाचालक असेच वागतात, असे म्हणणे चुकीचे आहे. परंतु, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या अधिक आहे, हे नक्की. बसला प्रवासी न मिळता ते आपल्या वाहनात बसावेत, यासाठी त्यांची जी काही जीवघेणी स्पर्धा बसस्थानकावर सुरू असते, त्यावर तर कोणाचेच नियंत्रण नाही. परिवहन मंडळ, प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग, इतकेच नव्हे तर पोलीससुद्धा त्यांच्यासमोर हतबल झाल्याचेच चित्र वारंवार निदर्शनास येते.
आपली रिक्षा किंवा ऑटो नियमानुसार चालवून शांतपणे आपल्या घरी जाणारे रिक्षाचालक हातावर मोजण्याइतकेच आहेत. काही रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा हा वाखाणण्याजोगा, त्याची दखल माध्यमांनी वारंवार घेतली आहे. परंतु, दुसरीकडे अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला आहे. रिक्षात बसल्यावर मोबाईलवर बोलताना त्यांच्या तोंडून जी शिवराळ भाषा ऐकायला मिळते, ती तर नको ही रिक्षा असे म्हणण्याची वेळ येते.
बेळगाव आणि गोवा यांचे जवळचे नाते आहे. व्यापार आणि उदिम, पर्यटन यापुरतेच हे नाते मर्यादित नाही. तर संस्कृतीनेसुद्धा या दोघांना जोडले आहे. त्यामुळे गोव्यातील बहुसंख्य व्यापारी, उद्योजकच नव्हे तर सर्वसामान्य माणसेसुद्धा खरेदीसाठी बेळगावला येतात. शनिवारी-रविवारी बेळगावमध्ये गोवेकरांची गर्दी लक्षणीयरीत्या दिसून येते. गणेशोत्सव काळात तर गोवेकरांची खरेदी बेळगावकरांच्याही आधी सुरू होते.
गोवेकरांचे बेळगावला येण्याचे प्रमाण घटण्याची शक्यता
अशावेळी बाहेरून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला बेळगाव हे अत्यंत शांत आणि आतिथ्यशील गाव असे वाटण्याऐवजी आता बेळगाव नको, असे म्हणण्याची वेळ येत असेल तर ती बेळगावकरांसाठी एक शोकांतिका आहे. मारहाण, हल्ले आणि लवू मामलेदार यांचा दुर्दैवी मृत्यू अशा घटना पाहता गोवेकरांचे बेळगावला येण्याचे प्रमाण घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा व्यापार आणि उद्योगावरही परिणाम होणार आहे. बेळगावमधून गोव्याला दूध व भाजी पुरवठा होतो. गोव्यातील हॉटेल व पर्यटन व्यवसायात बेळगावचे असंख्य तरुण काम करत आहेत. त्यामुळे गोवा व बेळगाव यांचे संबंध अधिकाधिक दृढ होण्याची गरज असताना मारहाणीमुळे गोव्याच्या एका माजी आमदारांचा बळी जाणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे.
रिक्षाचालकांना उदरनिर्वाहासाठी वाहन चालवणे आवश्यक आहे, हे एकवेळ समजू शकतो. परंतु, त्यासाठीची मनमानी फार काळ कोणी खपवून घेणार नाही, हेसुद्धा त्यांनी लक्षात ठेवावे. मीटरची सक्ती करताच एकजुटीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या रिक्षाचालकांनी, त्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी याबाबत रिक्षाचालकांना सबुरीचा सल्ला देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शिवाय पोलीस दलानेसुद्धा त्यांच्या मनमानीला वेळीच चाप लावणे आवश्यक आहे.









