वृत्तसंस्था/ बेंगळूर
पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात (दुबई) येथे 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे दोन संघ उपांत्य फेरीसाठी फेव्हरिट राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला प्रमुख वेगवान गोलंदाजांची उणीव चांगलीच भासेल. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा नियमीत कर्णधार पॅट कमिन्स, हॅजलवूड आणि मिचेल स्टार्क हे सहभागी होणार नसल्याने स्टीव्ह स्मिथकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. दरम्यान कर्णधार स्मिथ, हेड, इंग्लीस, मॅकगर्क, लाबुशेन आणि मॅक्सवेल हे ऑस्ट्रेलियन खेळाडू कोणत्याही वातावरणात दर्जेदार कामगिरी करु शकतात. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रबळतेबद्दल विचार केल्यास आतापर्यंत या संघाने सहावेळा आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तसेच एकदा आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि दोनवेळा चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली असल्याने पुन्हा यावेळी हा संघ जेतेपदाचा दावेदार ठरु शकेल. अलिकडेच झालेल्या वनडे मालिकेत लंकन संघाकडून त्यांना अनपेक्षित पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान लाबुशेन आणि मॅकगर्क यांच्या फॉर्मबद्दल संघाला काळजी वाटते.
इंग्लंड-
ब गटातून इंग्लंडचा संघ फलंदाजीत आणि गोलंदाजीतही कागदावर भक्कम वाटतो. जोस बटलर, फिल सॉल्ट, हॅरी ब्रुक, जो रुट, लिव्हिंगस्टोन हे या संघातील प्रमुख आक्रमक फलंदाज आहेत. इंग्लंडच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने फिरकी गोलंदाज आदिल रशीदवर राहील. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत रशिदची कामगिरी समाधानकारक झाली आहे. मात्र भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडची भक्कम असणारी फलंदाजी मात्र प्रभावी ठरु शकली नाही. भारताने या मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा वॉईटवॉश केल्याने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत इंग्लंडवर निश्चितच दडपण राहिला. रुट आणि बटलर वगळता इंग्लंडच्या इतर फलंदाजांना फिरकीसमोर आत्मविश्वासाने फलंदाजी करता आलेली नाही. इंग्लंड संघाने यापूर्वी पाकिस्तानमध्ये मालिका खेळल्याने त्यांना पाकमधील खेळपट्ट्या आणि वातावरण याची बऱ्यापैकी जाणिव आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला अफगाण संघाची इंग्लंडला खरीभिती वाटते. अफगाणच्या फिरकी समोर इंग्लंडच्या फलंदाजीची सत्वपरीक्षा ठरेल.
द. आफ्रिका
या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा द. आफ्रिकेचा संघ जेतेपदाचा संभाव्य दावेदार म्हणून ओळखला जातो. भारतीय संघानंतर या संघामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात विविधता चांगल्या प्रकारे आढळते. बवूमा, मारक्रेम, क्लासन, मिलर हे या संघातील स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. रबाडा आणि केशव महाराज यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे. रबाडा आणि केशव महाराज यांच्याकडे प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याची क्षमता निश्चितच आहे. मात्र या संघामध्ये काही दुबळ्या बाजुही आहेत. नुकत्याच झालेल्या तिरंगी वडने मालिकेत द. आफ्रिका संघाला अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यांना पाकिस्तानकडून महत्त्वाच्या सामन्यात हार पत्करावी लागली. दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेणाऱ्या नॉर्जेची उणीव चांगलीच भासेल. मात्र द. आफ्रिकेला आयसीसीची ही महत्त्वाची स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. पण चोकर्सची प्रतिमा त्यांना पुसावी लागेल.
अफगाण –
या स्पर्धेत sअफगाणचा संघ हा धोकादायक म्हणून ओळखला जातो. अनेक मात्तबर संघांना पराभवाचा धक्का देण्याची क्षमता या संघामध्ये गेल्या काही महत्त्वांच्या स्पर्धांमध्ये दिसून आली आहे. अफगाण हा या स्पर्धेतील अंडरडॉग म्हणून ओळखला जात असून प्रतिस्पर्धी संघांनी या संघाला कमी लेखण्याची चूक करतील, असे वाटत नाही. रशीद खान, हसमत्तुल्ला शाहीदी, गुलबदीन नईब आणि रेहमत शहा हे या संघातील प्रमुख खेळाडू आहेत. 2024 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल होती. या संघातील खेळाडूंकडे गुणवत्ता आणि आत्मविश्वासा ठासून भरला असल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपूर्वी त्यांना वनडे सामन्याचा सराव फारसा मिळालेला नाही. अफगाणचा संघ या स्पर्धेत आपले सामने कराची आणि लाहोर येथे खेळणार असून या ठिकाणच्या खेळपट्या फिरकीला अनकुल असल्याने रशिद खान, नईब, नूर अहम्मद व खरोटे यांच्या कामगिरीवर अफगाणचे यश अवलंबून राहिल. रेहमतुल्ला गुर्बाज, इब्राहीम झेद्रान, शाहीदी, अझमतुल्ला, ओमरझाई आणि नईब हे या संघातील प्रमुख फलंदाज आहेत.









