वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता आम आदमी पक्षाला दिल्लीत आणखी एक धक्का बसला आहे. या पक्षाच्या दिल्ली महानगरपालिकेतील तीन सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आता या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत झाले आहे.
अनिता बसोया, निखील चाप्राना आणि धर्मवीर अशी या नगरसेवकांची नावे आहेत. येत्या एप्रिलमध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या आधी हे पक्षांतर झाल्याने येथेही सत्तांतर झाले आहे. आता एप्रिलमध्ये होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता बळावली आहे. उपमहापौरपदही भारतीय जनता पक्षालाच मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हा आणखी एक धक्का आहे. 2022 मध्ये दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी आम आदमी पक्षाला 134 आणि भारतीय जनता पक्षाला 104 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडले गेले होते. आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले होते.
भाजपचे बहुमत कसे ?
महापौरपदाच्या निवडणुकीत लोकसभेचे सर्व खासदार, राज्यसभेचे तीन खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या 10 आमदारांना मतदान करता येणार आहे. 14 नियुक्त सदस्यांनाही मतदानात भाग घेण्याचा अधिकार आहे. ही सर्व मते जमेस धरता भारतीय जनता पक्षाचे बहुमत होत आहे, अशी माहिती देण्यात आली. राज्यसभेचे तीनही खासदार मात्र आम आदमी पक्षाचे आहेत.









