भारतात लोकशाही भक्कम, व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारण व्यवस्थेसाठी घातक
वृत्तसंस्था / म्युनिच
पाश्चिमात्य देशांमधील काही राजकारणी आणि तथाकथित विचारवंत भारतासंबंधी दुटप्पीपणा करीत असून वस्तुस्थिती लक्षात न घेता भारतीय लोकशाहीवर टीका करीत आहेत, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. ते म्यनिच येथील सुरक्षा परिषदेच्या कार्यक्रमात भाषण करीत होते. लोकशाहीत सध्या तथाकथित विचारमुक्ततेचे (लिबरॅलिझम) प्रमाण नको इतके वाढले आहे. त्यामुळे समतोल बिघडला असून ही स्थिती समाजासाठी लाभदायक नाही, अशी टीका त्यांनी या भाषणात केली आहे.
प्रत्येक देशातील समाज, त्याची धारणा, त्याची संस्कृती आणि मूल्ये भिन्न भिन्न असतात. त्यामुळे प्रत्येक देशातील लोकशाहीची संकल्पनाही निरनिराळी असते. एका समाजाची किंवा एका देशाची सूत्रे अन्य देशांना जशीच्या तशी लागू करता येत नाही. तसे करण अन्यायकारक आणि धोकादायक ठरु शकते. त्यामुळे भारतीय लोकशाहीचा विचार करताना तो भारताच्या पारंपरिक मूल्यांच्या आधारावर करण्याची आवश्यकता आहे. पाश्चिमात्य सूत्रे येथे लागू करण्याचा प्रयत्न करणे आणि त्या आधारावर भारतीय लोकशाहीला बोल लावणे अयोग्य आहे. मात्र, काही पाश्चिमात्य शक्ती असे करीत आहेत, अशी मांडणी त्यांनी केली आहे.
राजकारणबाह्या शक्तींचा उच्छाद
सध्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार वाढला आहे. या स्वैराचारालाच लोकशाहीचा तात्विक मुलामा फासण्याचा प्रयत्न चाललेला आहे. व्यक्तीस्वातंत्र्य किंवा लिबरॅलिझम याचा अर्थ कोणालाही कसेही वागण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य असा होत नाही. अलिकडच्या काळात काही सर्वेक्षण संस्था यांच्या असमतोल पद्धतीने विविध देशांमधील लोकशाहीवर भाष्य करीत आहेत. तसेच या लोकशाहीचे ‘रेटिंग’ करुन त्यांना कोणता देश मागे आणि कोणता पुढे हे एकांगी पद्धतीने ठरविण्याचा प्रयत्न या संस्थांकडून केला जात आहे. अशा संस्था किंवा अशा व्यक्ती लोकशाहीचे स्वयंघोषित तारणहार म्हणून मिरवितात आणि इतरांना प्रमाणपत्रे वाटतात. ज्यांनी कधी निवडणूक लढविली नाही, कधी सक्रीय राजकारणात भाग घेतला नाही किंवा ज्यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, असे लोक किंवा संस्था कोणी काय करावे याचे आगंतुक सल्ले देत आहेत. काय चांगले आहे आणि काय वाईट आहे, हे मनमानी पद्धतीने ठरवित आहेत. मात्र, भारत अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाखाली येऊन आपला मार्ग सोडणार नाही. अशा शक्तींना आव्हान दिले जाईल, अशी स्पष्टोक्ती एस. जयशंकर यांनी भाषणात केली.
देशोदेशींचे राजकारण भिन्न
प्रत्येक देशात राजकारण करण्याची पद्धती भिन्न असते. प्रत्येक देशात एक मुख्य राजकीय प्रवाह असतो. तसेच या प्रवाहाला विरोध करणाऱ्या शक्तीही असतात. तथापि, पाश्चिमात्य शक्ती या प्रवाहांवर एकांगी पद्धतीने व्यक्त होतात. पाश्चिमात्य देशांचे भारतातील राजदूत ज्या पद्धतीने वागतात आणि भारतातील घडामोडींवर ज्या प्रकारची भाष्ये करतात, तशा प्रकारची वर्तणूक भारताच्या राजदूतांनी त्या देशांमध्ये केली तर त्वरित काहूर उठविले जाते. हा दुटप्पीपणा घातक ठरत आहे. त्यामुळे आपली सूत्रे दुसऱ्याला लावण्यापूर्वी समतोल विचार करण्याची आणि प्रत्येक देशातील परिस्थितीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आपण अगदी धुतल्या तांदळासारखे आहोत, असे अशा शक्तींनी समजण्याचे कारण नाही, असा इशाराही जयशंकर यांनी अशा संस्थांना दिला आहे.
परिषदेचे महत्व
म्युनिच सुरक्षा परिषद ही गेली 61 वर्षे सातत्याने आयोजित केली जात आहे. या परिषदेत जगभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातो. यावर्षी ही परिषद जर्मनीतील म्युनिच या शहरात आयोजित करण्यात आली असून तिचा प्रारंभ 14 फेब्रुवारीपासून झाला आहे. ती आज रविवारपर्यंत चालणार आहे. ही परिषद जगातील काही महत्वाच्या परिषदांपैकी एक मानली जाते. या परिषदेत अनेक देशांचे प्रमुख राजकीय नेते, मंत्री आणि राजकीय तज्ञ भाग घेत असतात.
परोपदेशे पांडित्य आवरा
ड परिस्थितीचा अभ्यास न करता एखाद्या देशावर टीका करणे घातक
ड स्वयंघोषित लोकशाही रक्षणकर्त्यांकडूनच लोकशाहीला सर्वाधिक धोका
ड जागतिक राजकारणात दुटप्पी भूमिका घेणाऱ्या संस्थांची सध्या रेलचेल
ड भारताला आपल्या हिताची जाणीव, फुकाचा उपदेश ऐकला जाणार नाही









