भाजप खासदार बैजयंत पांडा अध्यक्ष : 31 सदस्यांमध्ये सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, रवींद्र वायकर, मोईत्रा यांचाही समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नवीन प्राप्तिकर विधेयक संसदेमध्ये सादर केले आहे. हे विधेयक विचारमंथन करण्यासाठी विशेष निवड समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन प्राप्तिकर विधेयकासाठी 31 सदस्यांची निवड समिती स्थापन केली. भाजप खासदार आणि ओडिशातील केंद्रपाडा येथील खासदार बैजयंत पांडा यांना अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तर समितीच्या सदस्यांमध्ये निशिकांत दुबे, जगदीश शेट्टर, महुआ मोइत्रा, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, पी. पी. चौधरी, सुधीर गुप्ता, नवीन जिंदाल, अनिल बलुनी, दीपेंद्र हु•ा अशा दिग्गजांचा समावेश आहे.
लोकसभा अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या समितीला पुढील संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अहवाल सादर करावा लागेल. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यानंतर पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात सुरू होऊ शकते. विशेष निवड समिती नवीन प्राप्तिकर विधेयकावर आपल्या शिफारसी देईल. त्यानंतर सरकार मंत्रिमंडळामार्फत सदर सुधारणांचा समावेश करायचा की नाही याचा निर्णय घेईल. त्यानंतर हे विधेयक संसदेत परत येईल आणि त्यानंतर सरकार त्याच्या अंमलबजावणीची तारीख ठरवेल.
गेल्या अनेक वर्षांपासून सरकार प्राप्तिकर कायदे सोपे करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी 2018 मध्ये एक कृती दल स्थापन केल्यानंतर 2019 मध्ये त्याने अहवाल सादर केला. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 13 फेब्रुवारी रोजी लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक सादर केले. 622 पानांचे हे विधेयक सहा दशके जुन्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेईल. प्रस्तावित कायद्याला प्राप्तिकर कायदा 2025 असे म्हटले जाणार असून ते एप्रिल 2026 मध्ये लागू होण्याची अपेक्षा आहे. सध्याचा प्राप्तिकर कायदा 1961 मध्ये मंजूर झाला. जे 1 एप्रिल 1962 पासून लागू झाले. यामध्ये वित्त कायद्यांतर्गत 65 वेळा 4 हजारांहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या.
समितीमधील सदस्यांची नावे…
बैजयंत पांडा (अध्यक्ष), निशिकांत दुबे, जगदीश शेट्टर, सुधीर गुप्ता, अनिल बलुनी, राजू बिस्ता, एटाला राजेंद्र, विष्णू दयाळ राम, मुकेशकुमार चंद्रकांत दलाल, पी. पी. चौधरी, शशांक मणी, भर्तृहरी महताब, नवीन जिंदाल, अनुराग शर्मा, दीपेंद्र सिंग हु•ा, बेनी बेहनन, विजयकुमार उर्फ विजय वसंत, अमर सिंग, अॅड. गोवल पडवी, मोहम्मद रकीबुल हुसेन, लालजी वर्मा, अॅड. प्रिया सरोज, महुआ मोईत्रा, कलानिधी वीरस्वामी, दग्गुमल्ला प्रसाद राव, कौशलेंद्र कुमार, अरविंद गणपत सावंत, सुप्रिया सुळे, रवींद्र दत्ताराम वायकर, एन. के. प्रेमचंद्रन, रिचर्ड वानलालहमंगाईहा.









