वडूज :
‘अहिंसा परमो धर्म की जय.. जिओ और जिने दो’ च्या जयघोषात येथे चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा तेवीसावा वार्षिक रथोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शनिवारी (ता. ८) कल्याण मंदिर विधानाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी स्मिता पाटील (पुणे) यांचे पालकत्व या विषयावर व्याख्यान झाले. रविवारी (ता. ९) बोलीचा कार्यक्रम झाला. यावेळी मनोज पाटील (आळते) यांचा धार्मिक गितांचा कार्यक्रम झाला. सोमवारी (ता. १०) पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात सौ. माणिकबाई रूपचंद शहा ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शिरीष शहा (अकलूज) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सागर दोशी यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन शहा यांनी रथात विराजमान होण्याचा बहुमान मिळविला. त्यानंतर रथ मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. जिओ और जिने दो…. अहिंसा परमो धर्म की जय, विश्वशांती की जय.. आदी घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. रथोत्सव मिरवणुकीपुढे घोडे तसेच वाद्यवृंद संच होते. यावेळी वीरगती प्राप्त झालेले जवान चंद्रकांत काळे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
महावीर उपाध्ये, विधानाचार्य दिनेश उपाध्ये यांनी धार्मिक विधी केले. उपस्थितांना चंचलाबाई शांतीलाल दोशी (वडूज), सुवर्णा रतनचंद दोशी (करमाळा), वनिता शहा, सुमन शहा, स्नेहलता शहा यांच्या कुटुंबियांवतीने महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमास सौ. माणिकबाई रूपचंद शहा ट्रस्टचे पदाधिकारी तसेच जिल्ह्या परजिल्ह्यांतील सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








