मेकॅनिकल विभागाच्या २२ विद्यार्थ्यांची झाली निवड
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केएसपीजी ऑटोमोटिव्ह या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले. यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.केएसपीजी ही वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणारी जर्मन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तिचा भारतातील उत्पादन प्रकल्प पुणे येथे कार्यरत आहे. कॅम्पस इंटरव्हयूसाठी मेकॅनिकल विभागाचे एकूण ४७ विद्यार्थी सहभागी झाले होते. ऍप्टीट्यूड टेस्ट, टेक्निकल इंटरव्हयू आणि एचआर इंटरव्हयू अशा तीन फेऱ्या पार पडल्यानंतर २२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी कंपनीतर्फे एचआर मॅनेजर व टेक्निकल टीम उपस्थित होती.यावेळी निवड समितीने गेली तीन वर्षे आपण याठिकाणी इंटरव्हयू घेत असल्याचे सांगितले. वायबीआयटीचे विद्यार्थी गुणवंत असून कंपनीतील त्यांची कामगिरी नेहमीच चांगली असते असा अभिप्राय दिला. इंटरव्हयू प्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी कॉलेजचे टीपीओ विभाग प्रमुख मिलिंद देसाई व कोऑर्डीनेटर महेश पाटील यांनी मेहनत घेतली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले.









