नंदगड लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला भाविकांचा प्रतिसाद : देवीचा आज-उद्या रथोत्सव
वार्ताहर /नंदगड
नंदगड (ता. खानापूर) येथील लक्ष्मीयात्रेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग दर्शवला. त्यामुळे मिरवणुकीला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. एकीकडे हर हर महादेव, लक्ष्मीदेवीचा जयजयकार तर दुसरीकडे भंडाऱ्याच्या उधळणीमुळे वातावरण पिवळेमय झाले होते. तब्बल 24 वर्षांच्या प्रदीर्घ अवधीनंतर नंदगड येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवीचा यात्रोत्सव होत आहे. त्यानिमित्त प्रत्येक भाविकांच्या मनात देवीच्या उत्सवाची तीव्र इच्छा दिसून येत होती. प्रत्येक घरातील व्यक्ती या उत्सवात सहभागी झाली होती. प्रत्येक घरातील सुहासिनी आपल्या लाडक्या देवीच्या स्वागतासाठी हातात आरती घेऊन सज्ज होती. दारात आलेल्या देवीची ओटी भरण्याची संधी महिलांनी सोडली नाही. देवीच्या स्वागतासाठी घरासमोर चटईवर कांबळे अंथरण्यात आले होते. त्यावर तांदळाने स्वस्तिक काढून लक्ष्मीदेवीची पावलेही उमटविण्यात आली होती. वाटेत सुंदर फुलांचा सडा टाकण्यात आला होता.
नियोजित मार्गानुसार शुक्रवारी सकाळी 8 वाजता मसूरकर गल्लीतून देवीच्या मिरवणुकीला सुऊवात झाली. लाकडी खांबांच्या आधाराने देवीला खांद्यावर घेऊन फिरविण्याचा हक्क रेमणू गल्लीतील नागरिकांना मिळाल्याने त्यांनी देवीला प्रत्येक घरोघरी नेले. गावातील अन्य युवकांनी यासाठी सहकार्य केले. मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपरिक वाद्ये, धनगरी ढोल, तुतारी वाद्य होते. घरी आल्यावर मशीनद्वारे भंडाऱ्याची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. त्यामुळे रस्त्यावर भंडाऱ्याचा खच दिसून येत होता. भाविक भंडाऱ्याने न्हाऊन निघाले होते.
सुऊवातीला रायापूरमधील सर्व गल्ल्यांमधून व तेथील देवदेवतांच्या मंदिरांसमोर देवी नेण्यात आली. जनतेने देवीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर पोलीस क्वॉर्टर्स, रायापूर रस्ता, तेथून मठ गल्ली येथे देवीची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 5 वाजता नंदगडमधील मुख्य गल्ली म्हणून समजल्या जाणाऱ्या बाजारपेठेत देवीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. बाजारपेठेत न भूतो अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत मोठ्या धामधुमीत मिरवणूक काढण्यात आली. या गल्लीतील महिलांनी देवीचे औक्षण करून मोठ्या उत्साहाने स्वागत केले. बाजारपेठेतील रस्ता ऊंद असल्याने देवीला खेळवण्याची संधी यावेळी युवकांनी सोडली नाही. हा प्रकार भाविकांना अचंबित करणारा ठरला. 24 वर्षांनंतर नव्या पिढीला पारंपरिक, धार्मिक कार्य व मार्गांची ओळख या यात्रेच्या निमित्ताने झाली.
बाजारपेठेतील चावडी खुटावर देवी वास्तव्याला
लक्ष्मीदेवीच्या विवाहानंतर तीन दिवस गावातील विविध ठिकाणी दिवसभराच्या मिरवणुकीनंतर रात्रीच्या वेळी देवी वास्तव्याला राहते. यासाठी लिलाव करण्यात येतो. जी व्यक्ती किंवा गल्ली या लिलावात जास्त बोली लावेल त्या ठिकाणी देवीचे वास्तव्य असते. वास्तव्याच्या ठिकाणी देवीची पूजा-अर्चा, गायन, भजन, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आपल्या गल्लीत देवी वास्तव्याला राहिल्याने मोठ्या अभिमानाने गल्लीतील लोक देवीची मनोभावे पूजा-अर्चा करून रात्रभर जागरण करतात. डोळ्याचे पारणे फेडणारा हा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या स्मरणात राहतो. शुक्रवार दि. 14 रोजी लक्ष्मीदेवी बाजारपेठेतील चावडी खुटावर वास्तव्याला होती. यानिमित्त रात्री 8 वाजता देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम व भजन कार्यक्रम झाला. रात्र जागरणात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला होता.
उद्या गदगेवर विराजमान
शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून चावडी खुटावरून देवीची पुन्हा मिरवणूक निघणार आहे. बाजारपेठमार्गे गणपत गल्ली, सानिकोप गल्ली, कुदळे गल्लीत देवीची मिरवणूक काढली जाणार आहे. दुपारी 2 वाजता लक्ष्मीदेवी रथात बसणार आहे. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत रथोत्सव होणार आहे. रविवारी पुन्हा रथोत्सवाला सुऊवात होणार असून सायंकाळी 4 वाजता देवी गदगेवर विराजमान होणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी यात्रोत्सव होणार आहे.









