पीक व्यवस्थित नसल्याने उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता : शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान
वार्ताहर/येळ्ळूर
येळ्ळूर परिसर हा बासमती भात व मसूर पिकांसाठी प्रसिद्ध आहे. पण गेली दोन वर्षे पावसाळी आणि हिवाळी पिकाचे फासे उलटे पडताना दिसत आहेत. त्यामुळे याही वर्षी भात पिकाप्रमाणे मसूर, वाटाणा, हरभरा या सारखी पिके मिळतील तेवढ्यावरच समाधान मानून घ्यावे लागणार आहे. पावसाने दिलेल्या दणक्याने भातपिके आडवी झाल्यानंतर मिळालेल्या ओलीचा फायदा घेत शेतकरीवर्गाने कडधान्याची पेरणी केली. मागील वर्षी ओलीअभावी शेतकऱ्यांच्या हाती कडधान्य लागलेच नाही. त्यामुळे मसूर सारख्या कडधान्याचे बियाणे पीक 300 रुपये प्रतिकिलो प्रमाणे विकत घेवून पेरणी करावी लागली. सुरुवातीला वातावरणातील थंडीमुळे कडधान्याची उगवण चांगली झाली. पण वातावरणातील बदल आणि परतीच्या पावसाचा ससेमिरा सुटला नसल्यामुळे पिकाला फंगस लागून पीक त्यांच्या बळी पडले. पिकाची वाढ खुंटली आणि मसूर, हरभरा अत्यल्प आले. त्यातच सतत वातावरण बदलाचा परिणाम म्हणून मर रोगाबरोबर फुलझडी ही मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पिकाला म्हणावा तसा बहर मिळाला नाही. आज पिके काढणीवर आली तरी त्यांची उंची आठ ते दहा इंचापलीकडे नाही.त्यामुळे त्यांना तुरळक प्रमाणात बोंडे असल्याने पिकाला उतारा मिळत नाही. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे घेवून केलेल्या पेरणीचा परतावा पेरलेले बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे.









