मुख्यमंत्री निवडीसाठी वरिष्ठ भाजप नेत्यांकडून चाचपणी सुरूच : येत्या आठवड्यात शपथविधी सोहळा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी तीव्र झाली आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. तत्पूर्वी 17 किंवा 18 फेब्रुवारी रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे. विदेश दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी आज परतणार असून त्यानंतरच सरकार स्थापनेची कसरत तीव्र होईल. सध्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री निवडीबाबत चर्चा आणि खलबते सुरू असून ती जवळपास पूर्णत्वास गेल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान देशात परतल्यानंतर, गृहमंत्री अमित शहा, जे. पी. न•ा आणि इतर वरिष्ठ भाजप नेत्यांसोबत बैठक होईल. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. तसेच 48 पैकी 15 आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी 9 नावे निश्चित करून मुख्यमंत्री, मंत्री आणि सभापतींची नावे निश्चित केली जातील. मुख्यमंत्र्यांसोबतच अन्य मंत्रीही एकाचवेळी शपथ घेऊ शकतात असे सांगितले जात आहे.
27 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भाजप दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण असेल यावरून विचारमंथन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री निवडण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल, असे सचदेवा यांनी स्पष्ट केले आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम आहेत. दरम्यान, दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर आमचे प्राधान्य यमुना स्वच्छ करणे हेच असेल असे स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. मुख्यमंत्री कोणीही असो, तो दिल्लीतील लोकांसाठी काम करेल आणि पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेल्या हमी पूर्ण करेल, असे तिवारी म्हणाले.
शपथविधीला एनडीए नेते उपस्थित राहणार
दिल्लीतील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा भव्य होईल असे मानले जात आहे. त्यामुळे थोडा वेळ घेतला जात आहे. या कार्यक्रमासाठी एनडीए नेत्यांना आमंत्रित केले जाईल. यासोबतच, एनडीएशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील.
मुख्यमंत्र्यांच्या नावाची उत्सुकता
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याचा विचार करत आहे. यासाठी लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. पण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्यांमध्ये पहिले नाव प्रवेश वर्मा यांचे आहे. वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. मुख्यमंत्री निवडीमध्ये भाजपने शीख चेहऱ्याला प्रोत्साहन दिले तर मनजिंदर सिंग सिरसा यांचे नाव पुढे येऊ शकते. प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.









