युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या दाव्यामुळे खळबळ : काँक्रिटच्या संरक्षक आवरणाचे नुकसान
वृत्तसंस्था/ तेल अवीव
युक्रेनच्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर गुरुवारी रात्री ड्रोनने हल्ला करण्यात आला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरले आहे. हा हल्ला नष्ट झालेल्या पॉवर रिअॅक्टर क्रमांक 4 वर करण्यात आला. हल्ल्यामुळे इमारतीत आग लागली असून ती तत्काळ विझवण्यात आली आहे. वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हल्ल्यासंबंधी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या हल्ल्याबाबत रशियाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
गुरुवारी रात्री उशिरा स्फोटकांनी सज्ज असलेल्या एका रशियन ड्रोनने चेर्नोबिल अणुभट्टीच्या काँक्रीट सुरक्षा कवचावर हल्ला केला, असे झेलेन्स्की म्हणाले. या हल्ल्यात संरक्षक आवरणाचे मोठे नुकसान झाले आहे. 1986 मध्ये चेर्नोबिल स्फोटानंतर रेडिएशन रोखण्यासाठी हे काँक्रीट आवरण बांधण्यात आले होते. याशिवाय, इतर कोणतेही नुकसान किंवा रेडिएशन पातळी वाढल्याचे वृत्त नाही.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये चेर्नोबिल प्रकल्पाच्या इमारतीतून प्रखर ज्वाला बाहेर येताना दिसत आहेत. तसेच संपूर्ण आकाश धुराने भरून गेल्याचेही दिसते. युक्रेनमध्ये स्थानिक वेळेनुसार पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले.
26 एप्रिल 1986 रोजी चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट झाला होता. त्यात येथे काम करणाऱ्या 32 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच अन्य शेकडो कामगार रेडिएशनच्या संपर्कात आले. तथापि, या स्फोटात किती लोक मृत्युमुखी पडले याची नेमकी संख्या आजपर्यंत कळू शकली नाही. तथापि, प्लांटमधील दुर्घटनेतून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गाचा 50 लाख लोकांना फटका बसला. कर्करोगासारख्या गंभीर आजारांमुळे 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. सोव्हिएत युनियनने हल्ला लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वीडिश अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी स्फोटाची कबुली दिली. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर चेर्नोबिल युक्रेनचा भाग बनले.









