डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांना संबोधले महान : अनेक द्विपक्षीय करारांवर सकारात्मक चर्चा-
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार शुक्रवारी पहाटे 3 वाजता) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. याप्रसंगी झालेल्या भेटीत ट्रम्प यांनी टॅरिफ मुद्यावर मोदींचे कौतुक करत त्यांना एक कठोर वाटाघाटी करणारा आपल्यापेक्षाही कुशल नेता असे संबोधले. तसेच मोदींना आपले जिवलग मित्र असे म्हणत ते चांगले काम करत असल्याचे सांगितले. दोघांमधील या भेटीमध्ये अनेक द्विपक्षीय चर्चांना मूर्त स्वरुप आले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन्ही देशांची प्रतिमा उजळली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ-35 लढाऊ विमाने पुरवण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी 2008 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यावर जाहीर निवेदन केले. तसेच या बैठकीत टॅरिफ समस्येच्या प्रत्येक पैलूवर चर्चा करण्यात आली. आम्ही एकमेकांसोबतची आमची धोरणात्मक भागीदारी वाढवत राहू. असा विश्वास दोघांनीही व्यक्त केला. द्वयींमधील भेटीनंतर त्यांनी संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांची दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर एका प्रश्नाचे उत्तर देताना मोदी म्हणाले की, ट्रम्प यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे ही आनंदाची बाब आहे. तसेच आपली आणि ट्रम्प यांची भेट म्हणजे ‘एक आणि एक अकरा’ असल्याचेही ते पुढे म्हणाले. त्याचवेळी ट्रम्प म्हणाले की, मोदी एक महान नेते आहेत आणि ते उत्तम काम करत आहेत. दोघांनीही संयुक्त निवेदनात केलेल्या एकमेकांच्या प्रशंसोद्गारांमुळे या भेटीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. वेस्ट विंग लॉबीमध्ये एकमेकांना अभिवादन करताना, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन देत आनंद व्यक्त केला. यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना बसण्यासाठी खुर्ची ओढली आणि त्यांना आदराने बसण्यास सांगितले. भारतीय बाजारपेठेत अमेरिकन अणु तंत्रज्ञान आणण्यासाठी भारत आपल्या कायद्यांमध्ये सुधारणा करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
बेकायदेशीर स्थलांतरावर स्पष्ट भूमिका
इतर देशांमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना तिथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. आम्ही नेहमीच म्हटले आहे की जे भारतीय नागरिक आहेत आणि अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत आहेत त्यांना परत आणण्यास आम्ही तयार आहोत, अशी स्पष्ट भूमिका नरेंद्र मोदी यांनी मांडली. सामान्य कुटुंबातील लोकांना मोठी स्वप्ने दाखवली जातात. त्यापैकी बहुतेकांना गैरमार्गाने येथे आणले जाते. ही व्यवस्था मुळापासून नष्ट करण्यासाठी अमेरिका आणि भारत दोघांनीही एकत्र काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.
दहशतवादावर रोख-ठोक भाष्य
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी ठोस कारवाई केली पाहिजे यावर आम्ही सहमत आहोत. भारतात नरसंहार करणाऱ्या गुन्हेगाराचे प्रत्यार्पण करण्याच्या निर्णयाचे मी कौतुक करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. खलिस्तानच्या मुद्यावर भारताचे बायडेन प्रशासनाशी चांगले संबंध होते असे मला वाटत नाही. बऱ्याच गोष्टी घडल्या ज्या बरोबर नव्हत्या, असेही ते पुढे म्हणाले. त्यानंतर ट्रम्प यांनीही इस्लामिक दहशतवादाच्या मुद्यावर भारतासोबत संयुक्तपणे काम करण्याची अमेरिकेची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
रशिया-युक्रेन युद्धावर ‘शांतते’ची भाषा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धावर महत्त्वपूर्ण बाजू मांडली. जगाचा दृष्टिकोन असा आहे की भारत तटस्थ आहे, परंतु भारत तटस्थ नाही, भारताची स्वत:ची भूमिका शांततेची आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आहोत की युद्धातून समस्यांचे निराकरण होऊ शकत नाही. खुल्या व्यासपीठावर चर्चा केल्यानंतरच कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध निवारणासाठी सुरू केलेल्या शांततेच्या प्रयत्नांना भारताचाही पूर्ण पाठिंबा असल्याचे मोदी म्हणाले.
ट्रम्प-मोदी भेटीची फलनिष्पत्ती…
अमेरिका भारताला एफ-35 लढाऊ विमाने देण्यास तयार
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात पाठवणार
इस्लामिक दहशतवादाविरुद्ध दोन्ही देश एकत्रित लढा देणार
ट्रम्प यांच्याकडून मोदींना ‘आवर जर्नी टुगेदर’ हे पुस्तक भेट
काय म्हणाले ट्रम्प…
आशिया पॅसिफिकसाठी भारत हा एक महत्त्वाचा देश असणार
अमेरिका भारतासोबत संरक्षणसंबंधी व्यवसाय आणखी वाढवणार
भारताला तेल व ऊर्जा पुरवण्यातही अमेरिका पुढाकार घेणार
एआय विकासासाठी एकत्र काम करण्याचीही अमेरिकेची तयारी
भारतासोबत अमेरिकेची व्यापारी तूट कमी करण्याबाबत करार
काय म्हणाले मोदी…
‘विकसित भारत’ म्हणजे भारताला पुन्हा महान बनवण्याचे ध्येय
ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा विचार
कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटमवर एकत्र काम करणार
अणुऊर्जेवर आधारित लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या बांधण्यात मदत
लॉस एंजेलिस, बोस्टनमध्ये नवे भारतीय वाणिज्य दूतावास उघडणार









