चॉकलेट आवडत नाही, असे लहान मूल सोडाच पण मोठा माणूसही मिळणे अवघड आहे. मधुमेहासारखा काही विकार असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण सर्वसाधारणत: प्रत्येकजण चॉकटेल चघळण्याचा आनंद घेतच असतो. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे असतो. त्या दिवशी चॉकलेटांचा खप अधिकच वाढतो. याच आठवड्यात एक चॉकलेट डे ही असतो, ज्या दिवशी एकमेकांना चॉकलेटे दिली जातात. दिल्लीच्या चांदनी चौक बाजारात एक चॉकटेलचा बाजार भरतो. येथे भंगार विकल्यासारखी अतिशय स्वस्तात, किलोच्या भावावर चॉकलेटे विकली जातात. बुट्ट्यांमधून उघड्यावर चॉकेलेले विक्रीसाठी ठेवलेली दिसून येतात. कांदे-बटाटे किंवा भाजी विकली जाते, तशी येथे चॉकलेले विकली जात असलेली पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. पण या बाजाराचे हे वैशिष्ट्याच असल्याचे दिसते.
तथापि, ही चॉकलेटे कोणत्या प्रतीची आहेत आणि त्यांची एक्सायरी डेट कोणती आहे, याचा मात्र पत्ता लागत नाही. तसेच ही चॉकलेटे न खपलेली आणि जुनी असल्यासारखी वाटतात, असाही अनेकांचा आक्षेप आहे. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांनी केवळ किंमत न पाहता आपल्या प्रकृतीवर, आणि विशेषत: लहान मुलांच्या प्रकृतीवर त्यांचा काय परिणाम होईल, याची जाणीव ठेवून खरेदी करण्याचा, किंवा न करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ञ देत आहेत. तरीही या बाजारात चॉकलेटांच्या ठेल्यांसमोर गर्दी दिसून येते. कारण मागचा पुढचा विचार न करता, केवळ किंमतीकडे पाहून वस्तू विकत घेणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. या चॉकलेटांचा रंग पांढुरका झालेला दिसून येतो. त्यामुळे अनेक जाणकारांनी ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अशी चॉकलेटे उघड्यावर विकली जात असताना फूड इन्स्पेक्टरांचे त्यांच्याकडे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्नही अनेक सुजाण नागरीकांना पडत आहे. तरीही, हा चॉकलेटांचा बाजार जोमाने भरतो. या संबंधीचे अनेक व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत.
दिल्लीत बाहेरच्या गावांमधून किंवा शहरांमधून आलेल्यांना या चॉकलेट बाजाराचे आकर्षण असते. कारण त्यांच्या त्यांच्या वास्तव्याच्या गावांमध्ये इतक्या कमी दरात चॉकलेटे मिळत नाहीत. त्यामुळे असे बाहेर गावचे अनेक ग्राहक या चॉकलेट बाजारात दिसून येतात. पण केवळ स्वस्त मिळतात म्हणून ती घेऊ नयेत, यासंबंधी लोकांचे प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे.









