सातारा :
सातारा शहरातील सुमारे 67 हजार मिळकतधारकांकडून 31 मार्चअखेर 42 कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट वसुली विभागाला आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी थकबाकीदार कितीही मोठा असला तरी त्याची वसुली करा असे स्पष्ट आदेश वसुली पथकांना त्यांनी दिलेले असून आतापर्यंत सुमारे 20 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
अजूनही 22 कोटींची वसुली करण्यासाठी कारवाई सुरू आहे. मात्र, गुरुवारी दिवसभरात केवळ एक नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. दरम्यान, थकबाकीदारांनी वसुली विभागाचा दट्ट्या थांबवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.
सातारा शहरातील हद्दवाढ झालेल्या भागासह सुमारे 67 हजार मिळकतधारक आहेत. या प्रत्येक मिळकतधारकांना लाईट, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधा देण्यासाठी कर वसुली होणे अपेक्षित असल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सातारा पालिकेने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार वसुली विभागाचे प्रमुख महादार यांच्यावर वसुलीची मोहीम सोपविण्यात आली आहे. त्यांनी डिसेंबरमध्येच पोवई नाका येथील एका हॉटेलवर कारवाई करून खाते उघडले. त्यानंतर वसुली विभागाची जप्तीची इनोव्हा शहरात फिरू लागली. त्या इनोव्हात वसुलीचे पथक हातात थकबाकीदारांची यादी घेऊन थकबाकीदारांच्या दारात पोहोचत आहे. तर दुसरे पथक सातारा शहरातील जी शासकीय कार्यालये थकीत आहेत त्यांना नोटीस बजावण्यासाठी फिरत आहे. पालिकेच्या वसुली विभागाचा ससेमिरा चुकवण्यासाठी काही थकबाकीदार थेट नेत्यांचे नाव सांगतात तर काही प्रभागातील नगरसेवकांना मध्यस्थी करत आहेत. मात्र, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट हे पहिला करा भरा असे त्या थकबाकीदारास स्पष्ट बजावतात. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक थकबाकीदार जाण्याचे टाळत असून थेट दोन्ही नेत्यांच्याकडे जाऊ लागले आहेत. दरम्यान, सातारा पालिकेला कसल्याही परिस्थिती वसुली करण्याची आहे. टार्गेट गाठायचे आहे म्हणून पथक भिंगरी लावून पळत आहे. मात्र, गुरुवारी त्यातल्या एका पथकाने एकच नळ कनेक्शन तोडला आहे. तो म्हणजे भालचंद्र गजानन पोरे वैगेरे, यादोगोपाळ, सि. स. नं. 34 या इमारतीमधील पाणी कर 59 हजार 573 रुपये थकबाकी होती. त्यामुळे नळ कनेक्शन बंद केल्याची कारवाई मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार कर अधिकारी उमेश महादर, वारंट ऑफिसर सुरज किर्दत यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ लिपिक गणेश टोपे, राजेंद्र शेळके, लिपिक कर्मचारी वर्ग तुकाराम गायकवाड, अशोक चव्हाण, युवराज खरात, नितीन रणदिवे, अनिल बडेकर, तुकाराम गायकवाड व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे अजून 22 कोटी वसुली करायची असून केवळ दि. 13 रोजी 1 नळ कनेक्शन बंद करण्याची दंडात्मक कार्यवाही केली आहे.
- नागरिकांनी कर वेळेत भरावा
सातारा शहरातील मिळकतधारकांनी आपला थकित मालमत्ता कर तातडीने नगरपालिकेत भरणा करावा व दंडात्मक कारवाईचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.
उद्दिष्ट…………………..42 कोटी
वसुली……………………20 कोटी
मिळकतधारक…………67 हजार
वसुली बाकी……………22 कोटी
- एका कॉलेजची तब्बल 30 लाख रुपये थकबाकी
सातारा शहरात एक नामांकित कॉलेज आहे. त्या कॉलेजला मागच्या काही वर्षांपूर्वी 10 लाख कर थकला होता. तेव्हा वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी पालिका तयार होती. मात्र त्या कॉलेजच्या संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता 30 लाख थकबाकी झाली आहे. ती त्या कॉलेजला, त्या संस्थेला भरावी लागेल अशी नोटीस सुद्धा वसुली पथकाने बजावली आहे.








